• Sat. Mar 15th, 2025

ईव्हीएममध्ये घोटाळे करुन काँग्रेस व भाजपने सत्ता समसमान वाटून घेतली -वामन मेश्राम

ByMirror

Mar 1, 2023

भारत मुक्ती मोर्चाची ईव्हीएम भांडाफोड राष्ट्रव्यापी परिवर्तन यात्रा शहरात दाखल

मेळाव्यात ईव्हीएम विरोधात जन आंदोलनाचा एल्गार

अहमदनगर (प्रतिनिधी)- काँग्रेस व भाजपने ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळे करुन सत्ता समसमान वाटून घेतल्याचा आरोप भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केला. तर ईव्हीएम मशीनचे घोटाळे पकडण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पेपर ऑडिट ट्रेल मशीन ईव्हीएमला जोडण्यासह पुनर्रमोजणीचे आदेश निर्गमीत केले असताना, हा घोटाळा झाकण्यासाठी आजही ईव्हीएम मशीन व पेपर ऑडिट ट्रेल मशीनची तुलनात्मक शंभर टक्के मतमोजणी होत नसल्याचे स्पष्ट केले.


भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने काढण्यात आलेली कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत ईव्हीएम भांडाफोड राष्ट्रव्यापी परिवर्तन यात्रेचे (भाग 2) नगरमध्ये आगमन झाले. यावेळी शहरात टिळकरोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात घेण्यात आलेल्या मेळाव्यात मेश्राम बोलत होते. प्रारंभी महापुरुषांना अभिवादन करुन रामकृष्ण कर्डिले यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन झाले. यावेळी रामकृष्ण कर्डिले, भास्करराव नरसाळे, योगी सुरजनाथ, अ‍ॅड. माया जमदाडे, मगन ससाणे, शिवाजी साळवे, घुगे महाराज शास्त्री, अ‍ॅड. महेश शिंदे, जालिंदर चौभे, रेव्ह. सतीश तोरणे, संजय कांबळे, गोरक्षनाथ वेताळ, शिवाजी भोसले, डॉ. भास्कर रणनवरे, प्रकाश लोंढे, गणपतराव मोरे, अमोल लोंढे, अतुल आखाडे, संजय संसारे, प्रा. रतीलाल क्षेत्रे, प्रा. सदा पगारे, भीमराव घोडके, डी.आर. राऊत, प्रभाकर सोनवणे, रावसाहेब साळवे, बबन साळवे, लता कांबळे, आशिष कांबळे आदींसह विविध सामाजिक संघटनेचे व भारत मुक्ती मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पुढे मेश्राम म्हणाले की, नरेंद्र मोदी नामधारी पंतप्रधान असून सत्तेची अंमलबजावणी खर्‍या अर्थाने आरएसएस करत आहे. 2004 मध्ये ईव्हीएम मध्ये घोटाळे करुन काँग्रेस सत्तेवर आली. त्यांची पोलखोल झाल्याने हाच घोटाळा करुन भाजपने सत्ता ताब्यात घेतली. दोन्हींनी ईव्हीएम विषयावर एकमेकांविरोधात मौन बाळगले असल्याचे त्यांनी सांगितले.


ईव्हीएम भांडाफोड राष्ट्रव्यापी परिवर्तन यात्रेचे शहरात स्वागत करुन रॅली काढण्यात आली. माळीवाडा बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा व माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन रॅलीचे प्रमुख चौकातून मार्गक्रमण झाले. ईव्हीएम मशीन हटाव लोकशाही बचावच्या घोषणा देत कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते. लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात रॅलीचा समारोप होऊन मेळव्याला प्रारंभ झाले. या मेळाव्यात भारत मुक्ती मोर्चा अहमदनगरच्या वतीने एक लाख रुपयांचा निधी जन आंदोलनासाठी देण्यात आला.


जिल्हाध्यक्ष शिवाजी भोसले म्हणाले की, निवडून आलेले लोकप्रतिनिधी जनमताचे नव्हे, तर ईव्हीएमच्या मतांचे आहे. ईव्हीएमच्या घोटाळ्यातून भाजप सत्तेवर येत आहे. रसद पुरवणारे सत्ता चालवत आसून, ईव्हीएमला न रोखल्यास भविष्यात हुकुमशाही प्रस्थापित होण्याचा धोका त्यांनी सांगितला. तर ईव्हीएम मशीन फोडो आंदोलनाची घोषणा त्यांनी केली.


शिवाजी साळवे म्हणाले की, देशात अल्पसंख्यांक समाजामध्ये अस्वस्थतेचे वातावरण तयार झाले आहे. एकतर्फी व्यवस्था काम करत आहे. चुकीच्या मार्गाने सत्तेवर आलेल्या व्यक्तींना बदलण्यासाठी इव्हीएम हटवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. अ‍ॅड. महेश शिंदे यांनी लोकशाहीत ईव्हीएमद्वारे मतांची चोरी होत आहे. ईव्हीएम मशीन हटविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन राष्ट्रीय आंदोलन उभे करण्याचे स्पष्ट केले.


घुगे महाराज शास्त्री म्हणाले की, ईव्हीएम मशीनमुळे देशाच्या लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. संविधान नष्ट करायची तयारी सुरु झाली आहे. हिंदू राष्ट्र करून चातुरवर्णीय व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. यासाठी ईव्हीएमच्या माध्यमातून सत्ता ताब्यात ठेवण्याचे काम केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अ‍ॅड. माया जमदाडे यांनी संविधान व नागरिकांचे मुलभूत अधिकार वाचवण्यासाठी ही यात्रा सुरू असल्याचे सांगितले. गोरख वेताळ यांनी शेतकरी, कामगार व सर्वसामान्य 85 टक्के लोक सत्ताधारींच्या विरोधात असताना ईव्हीएम घोटाळ्यातून भाजप सरकार निवडून येत आहे. या सत्तेतून सार्वभौम संपवले जात असल्याचे त्यांनी सांगितले.


मगन ससाने म्हणाले की, सत्ताधार्‍यांच्या साम, दाम, दंड, भेदच्या व्यवस्तेने परीसीमा गाठली आहे. गणतंत्र व्यवस्था संपवली जात असताना रस्त्यावर उतररुन विद्रोह करावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात रामदास धनवडे यांनी यात्रेचा उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भास्कर रणनवरे यांनी केले. आभार संजय संसारे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *