• Thu. Oct 16th, 2025

ईपीएस 95 पेन्शनर्सचे क्रांती दिनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार मोर्चा; पेन्शनर्सचे आत्मक्लेश आंदोलन

ByMirror

Aug 5, 2023

जिल्ह्यातील पेन्शनर्सना सहभागी होण्याचे आवाहन

अहमदनगर (प्रतिनिधी)- ईपीएस 95 पेन्शनर्सची पेन्शन वाढ लवकरात लवकर होण्यासाठी व संघटनेची चळवळ अटक सत्र राबवून दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्या निषेधार्थ क्रांती दिनी बुधवारी (दि.9 ऑगस्ट) ईपीएस 95 राष्ट्रीय संघर्ष समिती व ईपीएस 95 पेन्शर कल्याणकारी संघटनेच्या वतीने (महाराष्ट्र राज्य) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने जावून आत्मक्लेश आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन पश्‍चिम भारत संघटक सुभाष पोखरकर यांनी केले आहे.


राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत यांना अटक करुन पेन्शनर्सच्या आंदोलन दडपण्याचा झालेल्या प्रयत्नाच्या निषेधार्थ आत्मक्लेश आंदोलन केले जाणार आहे. पेन्शन वाढ मिळण्यासाठी राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत यांच्या नेतृत्वाखाली 4 ऑगस्ट रोजी शिष्टमंडळ श्रम मंत्री यांना भेटून चर्चा करण्यासाठी गेले होते. या शिष्टमंडळास कोणीही अधिकारी चर्चेसाठी आले नाही, मात्र पोलीस बळाचा वापर करुन त्यांना अटक करण्यात आली. लोकशाही मार्गाने होत असलेल्या मागणीचा व आंदोलन दडपण्याचा हा प्रकार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.


सर्व पेन्शनर्स सकाळी 10 वाजता तारकपूर बस स्थानक येथे जमून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने जाणार आहेत. तर आत्मक्लेश आंदोलन करुन केंद्र शासनाचे लक्ष वेधले जाणार आहे. आंदोलन यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष संपतराव समिंदर, शहराध्यक्ष संजय मुनोत जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *