ई फायलिंगमुळे न्यायालयात प्रकरण दाखल करण्याचा खर्च वाढणार -अॅड. कारभारी गवळी
अहमदनगर (प्रतिनिधी)- ई फायलिंग बाबत मोठया प्रमाणात सर्व न्यायालयांमध्ये धावपळ सुरु झाली आहे. अचानक ई फायलिंग कसे करायचे? यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. न्यायालयात प्रकरण दाखल करण्याचा खर्च मोठया प्रमाणात वाढणार असल्याची माहिती अॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
ई कोर्ट ही बाब चांगली आहे. परंतु सातत्याने तारखांवर तारखा देऊन प्रकरणे लांबविण्यामुळे लोकांना न्याय मिळत नाही. याच कारणामुळे देशभरातील न्यायालये वारी न्यायालय ठरत आहेत. न्याय संस्थेमध्ये आधुनिक तंत्राचा वापर झाला पाहिजे. कोरोना काळात जिल्हा न्यायालये बंद ठेवल्याने कायदा मोडीत निघाला होता. त्यावेळी व्हर्चुअल पध्दतीने न्यायालय चालविता येऊ शकले असते.
सध्या ई फायलिंगचा गाजावाजा केला जात असला तरी, रडत येणार्यांना लवकरात लवकर न्यायाची अपेक्षा आहे. यामुळे कायद्याचे राज्य राहून कायद्याला जिवंतपणा राहणार आहे. सर्वसामान्यांना लवकर न्याय कसा मिळेल? या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने सांगण्यात आले आहे. न्याय संस्थेकडून उन्नत चेतनेची अपेक्षा असून, त्यासाठी अॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, डॉ. मेहबुब सय्यद, अर्शद शेख, कैलास पठारे आदी प्रमत्नशील आहेत.
