• Mon. Oct 27th, 2025

इंडिया अगेन्स्ट तमस स्लेव्हरी संघटनेचे ऑपरेशन डिच्चू कावा 326 जारी

ByMirror

Mar 19, 2023

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त संविधानाच्या मार्गाने गुट्टलबाज सत्तापेंढारी विरोधातील मोहिम

अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय संविधानाचे कलम 326 खाली 18 वर्षावरील कोणत्याही भारतीय नागरिकाला लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये मतदान करण्याचा घटनात्मक अधिकार मिळालेला असताना या अधिकाराची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी इंडिया अगेन्स्ट तमस स्लेव्हरी संघटनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्‍वभूमीवर ऑपरेशन डिच्चू कावा 326 जारी करण्यात आला असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.


भारतीय संविधान या देशाने 1950 साली स्वीकारले आहे. परंतु त्यानंतरच्या 73 वर्षात या देशात लढण्यासाठी पुरेसे गुट्टलबाज सत्तापेंढारी तर जिंकण्यासाठी पुरेसे मतकोंबाड आणि जातमंडूक या तंत्राचा वापर अनेक राजकीय पक्षांनी केला. त्यातून तमस चेतना असलेल्या सत्तापेंढार्‍यांना मागच्या दाराने सातत्याने सत्ता मिळाली व त्यांनी जनतेची तिजोरी घरी वाहून नेली. या देशात सर्वसामान्यांना आर्थिक व सामाजिक न्याय मिळू शकला नाही. त्यामुळे झोपडपट्टया वाढल्या, बेघरांना घरे नाहीत, बेरोजगारी वाढली, महिलांवरील अत्याचार वाढले, शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्या. इंग्रज राजवटीपेक्षा सध्याची राजवट हि धर्म आणि जातीच्या नावावर लोकांची फसवणुक करत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.


या सत्तापेंढारींना सत्तेतून पायउतार करण्यासाठी संघटनेने जय शिवाजी, जय डिच्चुकावा हा महामंत्र जारी केला आहे आणि त्याचा भाग म्हणून ऑपरेशन डिच्चुकावा 326 लागू केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी 14 एप्रिलला दिल्लीगेट वेस समोर नागरिकांना साखर आणि फुलं देऊन हा घटनात्मक अधिकार राबविण्याचा आग्रह धरला जाणार आहे.


डॉ. बाबासाहेब आंवेडकर यांनी या देशात संविधानाच्या कलम 326 खाली प्रौढांना मताधिकार दिला आणि त्याचवेळेला सत्तापेंढार्‍यांविरुध्द डिच्चूकावा वापरण्याचा संविधानिक आधिकार देखील नागरिकांना प्राप्त झाला आहे. संविधानामुळे देशातील शोषित समाजाला माणुस म्हणून जगण्याचा आधिकार मिळाला. बाबासाहेबांचे स्मरण करुन कोणत्याही अमिषाला व जातीवादी प्रवृत्तीला बळी न पडता ज्या उमेदवारांला सर्वसामान्यांच्या प्रश्‍नाची आस्था व जाणीव आहे, अशा उमेदवारांना मतदान करण्याचे व सत्तापेंढार्‍यांना सत्तेतून पाय उतार करण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. या मोहिमेला गती देण्यासाठी अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, वीरबहादुर प्रजापती, विठल सुरम, अशोक भोसले, डॉ. महेबूब सय्यद, सुधीर भद्रे, ओम कदम आदी प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *