आशा सुपरवायझरचे प्रश्न न सुटल्यास 15 ऑगस्ट नंतर राज्यातील आमदार, खासदारांच्या घरासमोर धरणे -कॉ. राजू देसले
आशा सुपरवायझर संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी कॉ. सुवर्णा थोरात यांची नियुक्ती
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना काळात आशा सुपरवायझरनी मोठ्या धाडसाने कार्य केले. फक्त कौतुक करुन त्यांचे पोट भरणार नाही. यासाठी आशा सुपरवायझर (बी.एफ.) यांचे प्रश्न शासनाने तातडीने सोडविण्यासाठी आयटक प्रयत्नशील आहेत. आज पर्यंत आंदोलन, संपाने हक्क मिळविण्यात आली असून, आशा सुपरवायझरचे प्रश्न न सोडविल्यास 15 ऑगस्ट नंतर राज्य पातळीवर आयटकच्या माध्यमातून सर्व आमदार, खासदार यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा आशा गटप्रवर्तक संघटनेचे राज्य अध्यक्ष कॉ. राजू देसले यांनी दिला.

जिल्ह्यातील आशा सुपरवायझर यांच्या प्रश्नावर मार्केटयार्ड येथील हमाल भवन येथे झालेल्या मेळाव्यात कॉ. देसले बोलत होते. आयटकचे राज्य उपाध्यक्ष कॉ. अॅड. सुधिर टोकेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्याप्रसंगी जिल्ह्यातील आशा सुपरवायझर मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पुढे कॉ. देसले म्हणाले की, गटप्रवर्तक यांना फक्त प्रवास भत्ता दिला जातो. मात्र त्यांच्याकडून आरोग्य यंत्रणेचे काम करुन घेतले जाते. त्यांचा आरोग्य विभागात समावेश करून शासकीय कर्मचार्यांचा दर्जा देण्याची संघटनेची मागणी आहे. त्यांना सामाजीक सुरक्षा लागू करा व आशा सुपरवायझर नाव देण्यासाठी संघटना शासनाकडे दाद मागत असल्याची माहिती त्यांनी दिली.
प्रास्ताविकात आशा संघटनेचे जिल्हा संघटक कॉ. सुरेश पानसरे यांनी आयटक कामगार संघटनेची माहिती देऊन आशा सुपरवायझरांच्या प्रश्नावर शासनस्तरावर सुरु असलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली.

कॉ. अॅड. सुधिर टोकेकर म्हणाले की, ग्रामीण आरोग्य यंत्रणेचा पाया आशा व गटप्रवर्तकांवर अवलंबून आहे. ज्या देशाची आरोग्यसेवा भक्कम असते, तो देश भक्कम असल्याची प्रचिती कोरोना काळात सर्वांना आली. यासाठी गटप्रवर्तकांचे प्रश्न सोडविण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यांच्या हक्कासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. कामगार कायद्याप्रमाणे त्यांना लाभ मिळणे हा त्यांचा हक्क असल्याचे स्पष्ट करुन त्यांनी जिल्ह्यात संघटना आशा व सुपरवायझर यांच्यासाठी करत असलेल्या कामाची त्यांनी सविस्तर माहिती दिली.
आशा सुपरवायझर संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी कॉ. सुवर्णा थोरात यांची निवड झाल्याबद्दल कॉ. देसले व कॉ. टोकेकर यांनी त्यांचा सत्कार केला. उपाध्यक्षा नाझिया पठाण, आशा सुपरवायझर कॉ. सविता लेंडे (संगमनेर), कॉ. वाघमारे (अकोले), कॉ. ज्योती खंडीझोड (कोपरगाव), कॉ. अमृता गव्हाणे, कॉ. तरकसे मॅडम यांनी आपल्या मनोगतातून ज्वलंत प्रश्नांची जाणीव करुन दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉ. सुरेश पानसरे यांनी मानले. आभार कॉ. सतीश पवार यांनी मानले.