रस्त्यांचा प्रश्न राजकीय नसून, सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न -संदीप कापडे
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील महामार्गाच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी तीन दिवसापासून सुरु असलेल्या राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या उपोषणाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुरु असलेल्या उपोषणस्थळी आमदार लंके यांना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाचे जिल्हाध्यक्ष संदीप (नाना) कापडे यांनी पाठिंब्याचे पत्र देऊन उपोषणात सहभाग नोंदवला. यावेळी संघाचे उपाध्यक्ष अनिल गायकवाड, दीपक कांबळे, जनसंपर्क अधिकारी संतोष वाघ आदी उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष संदीप (नाना) कापडे म्हणाले की, जिल्ह्यातून जाणार्या महामार्गाची अत्यंत दुरावस्था झाली असल्याने दररोज लहान-मोठे अपघात होत आहे. यामध्ये सर्वसामान्यांचा जीव जात आहे. या प्रश्नाकडे शासन-प्रशासन लक्ष देत नाही. हा राजकीय प्रश्न नसून, सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. किमान रस्ते चांगले झाल्यास सर्वसामान्यांना घरी सुरक्षितपणे जाता-येता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.