बाबासाहेबांच्या विचार व तत्वाने आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाचे कार्य -संदीप कापडे
अहमदनगर (प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्केटयार्ड चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी मानवाधिकार संघाचे जिल्हाध्यक्ष संदीप (नाना) कापडे, कार्याध्यक्ष शरद महापुरे, अनिल गायकवाड, उपाध्यक्ष दीपक कांबळे, महिला सेल अध्यक्षा सविता हराळ, स्वाती दातीर, संतोष वाघ, गोरक्षनाथ साबळे, नितीन देवकर, विलास मकासरे, अशोक टाके, राम कवाने, वंदना शिंदे, उत्तम गरगडे, कैलास जगताप, उमंग फाउंडेशनचे डॉ. संतोष गिर्हे, वैष्णवी मल्टीपर्पज फाउंडेशनच्या ज्योती वाघ आदी उपस्थित होते.
मानवाधिकार संघाचे जिल्हाध्यक्ष संदीप (नाना) कापडे म्हणाले की, दीन-दलीतांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या शृंखला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तोडल्या. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार त्यांनी दिला. समाजातील अस्पृश्यता मिटवून समानता आणण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष प्रेरणादायी असून, त्यांचे विचार व तत्वाने आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ कार्य करुन दीन-दुबळ्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.
दीपक कांबळे म्हणाले की, समतेसाठी सत्याग्रह करुन उपेक्षितांच्या जीवनामध्ये डॉ. बाबासाहेबांनी अस्मितेची ज्योत पेटवली. डॉ.बाबासाहेबांचा जयघोष करत असताना त्यांच्या विचारांचे अनुयायी झाल्यास समाजातील प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
