शिवाजी महाराजांच्या 15 फुटी पूर्ण कृती पुतळ्याने वेधले लक्ष
अहमदनगर (प्रतिनिधी)- अरणगाव (ता. नगर) मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अरणगाव युवा प्रतिष्ठानच्या वतीने मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा 15 फुटी पूर्ण कृती पुतळा अभिवादनासाठी ठेवण्यात आला होता. जय भवानी… जय शिवाजी… च्या घोषणा देत युवकांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
लाल बावटा कामगार युनियनचे सेक्रेटरी कॉ. अॅड. सुधीर टोकेकर व अवतार मेहेरबाबा कामगार युनियनचे युनिट अध्यक्ष कॉ. सतीश पवार यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी विजय भोसले, सुभाष शिंदे, संदीप शिंदे, नवनाथ भिंगारदिवे, विकास कांबळे, मयूर थोरात, प्रवीण शिंदे, अक्षय शिरवाळे, संदीप कांबळे, पंढरीनाथ मुदळ, राजेंद्र मोरे, सागर पवार आदींसह गावातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कॉ. अॅड. सुधीर टोकेकर म्हणाले की, शिवाजी महाराज एका समाजापुरते मर्यादित नसून, त्यांनी अठरापगड जातीच्या मावळ्यांना बरोबर घेऊन रयतेचे राज्य निर्माण केले. महाराजांच्या पुर्वजांचा इतिहास नगरच्या मातीशी जोडला गेलेला आहे. शिवाजी महाराजांनी जाती, धर्मापलीकडे जाऊन स्वराज्याची निर्मिती केली. समाजातील अन्याय, अत्याचार, दडपशाहीचा त्यांनी बीमोड करुन, प्रजेचे हित हेच अंतिम ध्येय समजून राज्यकारभार केला. त्यांचे विचार व कार्य समाजाला प्रेरणा देणारे असल्याचे त्यांनी सांगितले.

कॉ. सतीश पवार म्हणाले की, महाराजांचा विशिष्ट जाती, धर्माला विरोध नव्हता तर दृष्ट प्रवृत्ती व अन्याया विरोधात त्यांचा लढा होता. अनेक गुणवान मुस्लिम सरदारांना त्यांनी स्वराज्य दरबारात विश्वासाची जबाबदारीचे पद दिले. आज समाजात वाढत चाललेल्या जातीय, सामाजिक विषमेताचा प्रश्न सोडविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
