पारनेर पंचायत समितीद्वारे शासकीय कामात झालेल्या अनियमिततेच्या चौकशीची मागणी
उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचे लेखा व वित्त अधिकारी यांना चौकशीच्या लेखी आदेशाने उपोषण मागे
अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर पंचायत समितीच्या माध्यमातून शासकीय कामात झालेल्या अनियमिततेची चौकशी होत नसल्याने अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने सोमवारी (दि.30 जानेवारी) जिल्हा परिषद समोर उपोषण करण्यात आले. या उपोषणात समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे, पारनेर तालुकाध्यक्ष पप्पू कासुटे, सदस्य पांडुरंग धरम, रतन खत्री, भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशचे योगेश कुलथे, मनसे उपाध्यक्ष रवी रासकर, रिपब्लिकन युवा सेनेचे जिल्हा संघटक मेहर कांबळे, राहुल कांबळे आदी सहभागी झाले होते.
पंचायत समितीद्वारे झालेल्या दलित वस्ती सुधार योजनेच्या कामात अनियमितता झाली असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. तसेच चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोग कामाची दप्तर तपासणीची मागणी देखील करण्यात आलेली आहे. दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीचा गैरवापर झालेला असताना त्याची चौकशी देखील प्रलंबीत असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. याप्रकरणी तातडीने चौकशी करुन संबंधीत दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
या उपोषणाची दखल घेऊन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) सुरेश शिंदे यांनी लेखा व वित्त अधिकारी यांनी त्याच्या स्तरावरील लेखाधिकारी/ सहा. लेखाधिकारी यांची तपासणीसाठी नेमणूक करुन तसा आदेश पारीत करण्याचा व पंधराव्या वित्त आयोगाच्या संपूर्ण दप्तर तपासणी करुन अहवाल सादर करण्याचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना लेखी पत्र काढल्याने उपोषण मागे घेण्यात आले.