• Wed. Feb 5th, 2025

अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळकांना नेत्रदान व अवयवदान जनजागृतीने अभिवादन

ByMirror

Aug 1, 2022

अहमदनगर जिल्हा रुग्णालय व फिनिक्स सोशल फाऊंडेशनचा संयुक्त उपक्रम

समाजजागृतीचा महापुरुषांचा आदर्श समोर ठेऊन नेत्रदान व अवयवदानाची जागृती आवश्यक -जालिंदर बोरुडे

अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अहमदनगर जिल्हा रुग्णालय व फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने नेत्रदान व अवयवदानची जनजागृती करण्यात आली. सिध्दार्थनगर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन या अभिनाची सुरुवात करण्यात आली. यावेळी फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. लक्ष्मण पोकळे, मनसचे नितीन भुतारे, जिल्हा रुग्णालयाचे नेत्रदान समुपदेशक सतीश अहिरे, श्रीराम शिंदे, सुनिल सकट, अशोक भोसले, बालक मंदिर शाळेचे मुख्याध्यापक सुरेश शेवाळे आदींसह शालेय शिक्षक व नागरिक उपस्थित होते.


जालिंदर बोरुडे म्हणाले की, समाजजागृतीने देश घडविणार्‍या महापुरुषांचा आदर्श समोर ठेऊन आज समाजात मरणोत्तर नेत्रदान व अवयवदानाची जागृती होणे आवश्यक आहे. मरणोत्तर नेत्रदान काळाची गरज बनली आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानाने दोन व्यक्तीच्या जीवनात प्रकाश निर्माण होतो. नेत्रदान व अवयवदानबद्दल गैरसमजुती व अंधश्रध्दा दूर झाल्यास या चळवळीला गती येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


अ‍ॅड. लक्ष्मण पोकळे म्हणाले की, आज मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव विविध अवयवाच्या प्रतिक्षेत आहे. कोणतेही अवयव व डोळे कृत्रिमरित्या तयार होत नसून, मरणोत्तर नेत्रदान व अवयव दान झाल्यानेच त्याचे जीवन प्रकाशमान होणार असल्याचे सांगून, त्यांनी या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले. नितीन भुतारे यांनी शरीर हे नष्वर असून, मरणोत्तर नेत्रदान व अवयवदानाने एखाद्याला नवजीवन देता येऊ शकते. ही संकल्पना समाजात रुजली गेली पाहिजे. यासाठी फिनिक्स फाऊंडेशन व जिल्हा रुग्णालयाचे सुरु असलेले कार्य दिशादर्शक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


या उपक्रमात अभिवादनसाठी आलेल्या कार्यकर्त्यांना मरणोत्तर नेत्रदान व अवयवदानचे संकल्प अर्ज व माहिती पत्रके वाटप करण्यात आले. नेत्रदान समुपदेशक सतीश अहिरे यांनी नेत्रदान व अवयवदान चळवळ ही काळाची गरज असून, मृत्यूनंतरही अवयवदानाने इतरांची गरज भागवून अवयवरुपाने जिवंत राहता येत असल्याचे त्यांनी सांगितले. नेत्रदानाच्या अहवानाला प्रतिसाद देत यावेळी अनेक नागरिकांनी नेत्रदान व अवयव दानाचा संकल्प केला. हा उपक्रम जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण व दृष्टीक्षिणता कार्यक्रमांतर्गत घेण्यात आला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *