मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार; टेंडर प्रक्रिया गुप्तपणे राबवल्याचा आरोप
कार्यकारी अभियंत्यांवर शिस्तभंगाची मागणी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषच्या कार्यकारी अभियंता (दक्षिण व उत्तर) यांनी कामांच्या निविदा प्रक्रियेत गंभीर अनियमितता व गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणाची तक्रार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे. निवेदनात टेंडर प्रक्रियेत झालेल्या विविध त्रुटींवर सविस्तर प्रकाश टाकण्यात आला आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, दि. 31 ऑक्टोबर 2025 रोजी कार्यकारी अभियंता (दक्षिण व उत्तर) यांनी बी-1 निविदा जाहीर केल्या. मात्र, जाहीर करण्यात येणाऱ्या प्रत्येक निविदेची माहिती जिल्हा परिषदेच्या सूचना फलकावर लावणे बंधनकारक असतानाही, संबंधित अधिकाऱ्यांनी कोणत्याही नोटीस बोर्डवर माहिती प्रदर्शित केली नाही. इतकेच नव्हे तर तब्बल 40 कामांची यादी फक्त एका वृत्तपत्रात प्रसिद्ध करून टेंडर प्रक्रिया राबविली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सदर निविदांसाठी 31 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 2025 अशी मुदत देण्यात आली होती. मात्र, संपूर्ण प्रक्रिया गुप्ततेत राबवून काही निवडक ठेकेदारांना लाभ मिळेल, अशा पद्धतीने निविदा मागविण्यात आल्याचा संशय तक्रारदारांनी व्यक्त केला आहे. संबंधित अर्जात नमूद केले आहे की, कार्यकारी अभियंत्यांनी जिल्हा परिषद अधिनियम व नियमांची उघड उघड पायमल्ली केली असून, आपल्या पदाचा गैरवापर करून मनपसंत व जवळच्या ठराविक ठेकेदारांना काम मिळावे, यासाठी जानूनबुजून ही प्रक्रिया लपविली गेली.
तक्रारदारांनी असेही म्हटले आहे की, जबाबदारीची विचारणा केल्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी अरेरावीची भाषा वापरली. तसेच कामवाटप समितीकडे चौकशीचे निर्देश दिले, परंतु प्रत्यक्षात टेंडरपासून वर्क ऑर्डरपर्यंत संपूर्ण जबाबदारी कार्यकारी अभियंता यांच्याच अखत्यारीत येते. या भूमिकेतून ते स्वतःला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपेक्षा वरिष्ठ समजत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणाची दखल घेऊन दोन्ही कार्यकारी अभियंत्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी आणि सदर टेंडर प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर अनिकेत वाघ, सद्दाम शेख, सुरेश लोखंडे, शहेबाज सय्यद, गणेश लांडगे, प्रमोद गाडेकर आणि अभिजीत लांडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
