• Mon. Nov 3rd, 2025

स्वच्छता मॉनिटर प्रकल्पात बाबुर्डी घुमटची जिल्हा परिषद शाळा राज्यातील सर्वोत्तम मध्ये निवड

ByMirror

Oct 12, 2023

प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण; राज्याच्या शंभर शाळांमध्ये समावेश

मुंबई येथे होणार शाळेचा व विद्यार्थ्यांचा गौरव

अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र कचऱ्याबाबत निष्काळजी मुक्त करण्याच्या उद्देशाने राज्यातील शिक्षण विभागाने सुरु केलेल्या स्वच्छता मॉनिटर प्रकल्पाचा पहिला टप्पा 2 ऑक्टोबर रोजी नुकताच पार पडला. प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणजे शाळा आणि विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर प्रकल्पात नेमके काय करायचे हे समजण्यासाठीचा महत्वपूर्ण टप्पा होता. या पहिल्या टप्प्यात नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट जिल्हा परिषद शाळा राज्यातील शंभर शाळेच्या यादीत सर्वोत्तम म्हणून स्थान पटकाविले आहे. स्वच्छता मॉनिटर प्रकल्पात राज्यातील 64 हजार शाळांनी सहभाग नोंदवलेला आहे.


पहिल्या टप्यात राज्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यातील नोंदणीकृत 64 हजार शाळांपैकी सर्वाधिक प्रभावी 100 शाळांचे कौतुक आणि सत्कार मुंबई येथे एका कार्यक्रमात होणार आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाबुर्डी घुमट व शाळेतील निवडक विद्यार्थ्यांना महाराष्ट्र स्वच्छता मॉनिटरने गौरवण्यात येणार आहे.


शाळेचे मुख्याध्यापक नंदू गंगाधर धामणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप परभाणे व ग्रामपंचायत बाबुर्डी घुमट यांनी त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर बनवून जागो जागी बेफिकीर लोकांना थांबवण्यास प्रोत्साहित केले. शाळा समन्वयक सोहनी पुरनाळे व सर्व वर्ग शिक्षक नियमित विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून, त्यांचे अनुभव ऐकून त्यांना मार्गदर्शन केले. तर या उपक्रमासाठी सरपंच नमिता पंचमुख, उपसरपंच तान्हाजी परभाने, ग्रामपंचायत सदस्य पवन लांडगे, ज्योती परभाने, वंदना चव्हाण, मुंजाळ शाबाई यांनी सहकार्य केले.


या प्रकल्पात विद्यार्थी स्वच्छतेचे महत्व पटवून देणारे किंव्हा संदेश देणारे दूत नसून; कळत नकळत झालेली चूक निदर्शनास आणून ती सुधारायला सांगणारे मॉनिटर आहेत. विद्यार्थ्यांनी वाटेल तिथे कचरा टाकणाऱ्यांना आणि बेफिकीर थुंकणाऱ्यांना जागच्या जागी थांबवून झालेली चूक दाखवून देत होते. विद्यार्थ्यांने गांधीगिरी करत इतरांने केलेली घाण साफ करणे अपेक्षित नसून, घाण करणाऱ्यालाच साफ करायला विनंती करणे अपेक्षित आहे. स्वच्छता मॉनिटरगिरी म्हणजे सफाई करणे किंव्हा भाषणबाजी नसल्यामुळे मुलांना मजा येते. आणि त्यापुढे घटनेचे विवरण सांगतानाचे मजेशीर करून सोशल मीडियाला शेअर करणे त्यांच्या आवडीचे काम बनले आहे. पहिल्या टप्प्यात असे 15 लाख हुन अधिक विडिओ शेअर झाले आहेत. दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर गिरी करण्याची सवय होण्यावर लक्ष्य केंद्रित होणार आहे. ठिकठिकाणी प्रत्येक चुकीला कोणी ना कोणी जागरूक राहतील आणि महाराष्ट्र निष्काळजी मुक्त बनेल हा प्रकल्पाचा उद्देश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *