उमेद सोशल फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम
शिक्षणाने बदल घडवता येतो, हा आत्मविश्वास प्रत्येकाने बाळगावा -अनिल साळवे
अहमदनगर (प्रतिनिधी)- उमेद सोशल फाउंडेशनच्या वतीने सक्षम पिढी घडविण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद शाळेला महापुरुषांच्या प्रतिमा व शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर जिल्हा परिषद शाळेत झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी नगरसेवक सचिन सरोदे, उमेद फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल साळवे, उपाध्यक्ष कुणाल तनपुरे, खजिनदार संजय निर्मळ, सल्लागार ॲड.दीपक धीवर, सचिव सचिन साळवी, नुरील भोसले, प्रदीप बागुल, विजय लोंढे, प्रकाश भालेराव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण जगताप, अंगणवाडी सेविका ज्योती जोशी, शर्मिला रूपटक्के, अतुल गोसावी, सोमनाथ धोंडे, कैलास कल्हापुरे उपस्थित होते.
सचिन सरोदे म्हणाले की, उमेद सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून सातत्याने गरजू घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. वंचित घटकातील मुलांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांना आधार दिला जात आहे. शाळेला देण्यात आलेल्या महापुरुषांच्या प्रतिमा मुलांमध्ये संस्कार व आत्मविश्वास रुजवण्यासाठी महत्त्वाच्या ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अनिल साळवे म्हणाले की, संघर्षातूनच मनुष्य घडत असतो. सर्वच महापुरुष संघर्षातून पुढे आली. त्यांच्या विचार व कार्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी शाळेला महापुरुषांच्या प्रतिमा देण्यात आल्या. तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट करुन बिकट परिस्थितीचा विचार न करता, शिक्षणाने बदल घडवता येतो हा आत्मविश्वास प्रत्येकाने बाळगण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाप्रसंगी शालेय शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभदा पवार यांनी केले. आभार शर्मिला रुपटक्के यांनी मानले.