शहरात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले जाणार -एहसान अहमद खान
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम वरिष्ठ नेते करणार आहे. गुन्ह्यांच्या भीतीपोटी युवक भाजपची विचारधारा स्वीकारणार नाही. भाजपने मांडलेल्या नफरतच्या बाजारात काँग्रेसची मोहब्बतची दुकान भारी पडत असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रभारी एहसान अहमद खान यांनी केले.
शहरातील रहेमत सुलतान सभागृहात युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे युवा संमेलन पार पडले. या संमेलनात युवकांना संबोधित करताना खान बोलत होते. याप्रसंगी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत ओगले, काँग्रेस अल्पसंख्यांकचे प्रदेश सचिव निजाम जहागीरदार, शहर जिल्हा युवक अध्यक्ष मोसिम शेख, काँग्रेसचे जिल्हा चिटणीस श्यामराव वागस्कर, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, सामाजिक कार्यकर्ते राजूभाई शेख, तालुका अध्यक्ष बाबा जाधव, अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष अकदस शेख, काँग्रेसचे सोशल मीडिया उत्तर महाराष्ट्र समन्वयक सागर इरमल, सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष अक्षय गायकवाड, अल्पसंख्यांक उपाध्यक्ष तौफिक शेख, रिजवान शेख, अभिजीत कांबळे, नवाज शेख, निजाम पठाण, संजय झोडगे, अशोक भिंगारदिवे आदींसह युवक सहभागी झाले होते.

पुढे खान म्हणाले की, युवकांनी शहरात काँग्रेसची विचारधारा जिवंत ठेवली. विधानसभेत युवक काँग्रेसचा उमेदवार देण्यासाठी पक्ष श्रेष्ठींकडे प्रस्ताव मांडणार असल्याचा विश्वास त्यांनी दिला. 2014 पासून मोदींच्या नेतृत्वाखाली सत्तेत आलेले भाजप सरकार देशात असंवेधानिक कार्य करुन समाजात व जाती-धर्मात एकमेकांना लढविण्याचे कार्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजप विरोधात भूमिका घेणाऱ्या युवकांना गुन्ह्यात अडकवण्याचे काम केले जात आहे. काँग्रेस सत्तेत आल्यानंतर त्यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घेण्याचे कामही करणार असल्याचा विश्वास त्यांनी दिला.
या युवा संमेलनात उपस्थित युवकांनी विविध समस्या मांडून काँग्रेसमध्ये काम करताना वरिष्ठांकडून पाठबळ दिले जात नसल्याची खंत व्यक्त केली. तर विधानसभेसाठी शहराची जागा घेऊन युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोसिम शेख यांना उमेदवारी देण्याची मागणी उपस्थित युवकांनी केली. श्यामराव वागस्कर यांनी शहरातील विविध प्रश्न मांडले.
खलील सय्यद यांनी युवकांच्या माध्यमातून शहरात बदल घडणार आहे. युवकांमध्ये बदल घडविण्याची शक्ती असून, युवकांनी एकजुटीने पुढे येण्याचे सांगितले.
प्रशांत ओगले म्हणाले की, निवडणुकीचा स्टंट म्हणून हिंदू-मुस्लिम समाजात भांडणे लावण्याचे काम भाजप करत आहे. हे काम करणाऱ्या नेत्यांना उमेदवारी व बळ देण्याचे काम केले जात आहे. काँग्रेस सर्व जाती-धर्माला बरोबर घेऊन कार्य करत आहे. भाजपचे विचार धर्मांधतेला प्रोत्साहन देणारे असून, नागरिकांना देखील याची जाणीव झाल्याने सत्तापरिवर्तनाची चाहूल लागल्याने त्यांनी जाती-धर्माच्या नावावर भांडणे लावण्याचे काम सुरु केले असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी बाबा जाधव यांची युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करुन त्यांचा उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निजाम जहागीरदार यांनी केले. आभार मोसिम शेख यांनी मानले.
