वारंवार वादग्रस्त वक्तव्य करुन हिंदू-मुस्लिम समाजात द्वेष पसरवित असल्याचा केला निषेध
भाजप नितेश राणे यांना पुढे करुन महाराष्ट्रात जातीय दंगली पेटविण्याच्या तयारीत -एहसान अहमद खान
अहमदनगर (प्रतिनिधी)- वारंवार वादग्रस्त व चिथावणीखोर वक्तव्य करुन हिंदू-मुस्लिम समाजात द्वेष पसरवित असल्याच्या निषेधार्थ शहरात युवक काँग्रेसच्या वतीने भाजपचे आमदार नितेश राणे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. जातीयवादी प्रवृत्तीचा निषेध नोंदवून समाजात अशांतता पसरविणाऱ्या राणे यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
मंगलगेट, कोठला परिसरात झालेल्या आंदोलनात महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रभारी एहसान अहमद खान, काँग्रेस अल्पसंख्यांकचे प्रदेश सचिव निजाम जहागीरदार, युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत ओगले, शहर जिल्हा युवक अध्यक्ष मोसिम शेख, काँग्रेसचे जिल्हा चिटणीस शामराव वागस्कर, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, सामाजिक कार्यकर्ते राजूभाई शेख, अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष अकदस शेख, काँग्रेसचे सोशल मीडिया उत्तर महाराष्ट्र समन्वयक सागर इरमल, सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष अक्षय गायकवाड, रिजवान शेख, अभिजीत कांबळे, तौफिक शेख, नवाज शेख, निजाम पठाण, संजय झोडगे, अशोक भिंगारदिवे, नवनियुक्त युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष बाबा जाधव आदींसह युवक सहभागी झाले होते.
एहसान अहमद खान म्हणाले की, भाजप नितेश राणे यांना पुढे करुन महाराष्ट्रात जातीय दंगली पेटविण्याच्या तयारीत आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे अनेक सर्वेक्षणातून पुढे येत असताना, सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. यासाठी राज्यात हिंदू-मुस्लिमांमध्ये द्वेष पसरविण्याचे काम सुरु आहे. दोन्ही समाजाने संयमाची भूमिका घेऊन यामागचे राजकारण तपासावे. युवकांचे माथी भडकविण्याचे हे षडयंत्र असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रशांत ओगले यांनी समाजाचा विचार बदलण्याचा प्रयत्न जातीयवादी पक्षाकडून सुरु आहे. दिवसाढवळ्या भाजपचा हा आमदार संविधानाची मुल्यांवर घाला घालण्याचे काम करत आहे. तर दुसरीकडे भाजप लोकशाही व संविधान धोक्यात बतावणी करत असून, अशा जातीयवादी प्रवृत्तीमुळे संविधान धोक्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
मोसिम शेख म्हणाले की, वारंवार भडकाऊ भाषण करुन नितेश राणे, मुस्लिम समाजातील युवकांना डीवचण्याचे काम करत आहे. राज्यात जातीय दंगली पेटविण्याचे काम त्यांच्या माध्यमातून सुरु असून, त्याला भाजपचे पाठबळ मिळत आहे. राज्यात सर्व समाज गुण्यागोविंदाने राहत असताना त्यामध्ये विष कालवण्याचे काम स्वत:च्या राजकारणासाठी करत असल्याचे त्यांनी सांगितले.
