कामगार वर्गासाठी सुरु असलेल्या संघर्षमय कार्याची दखल
नगर (प्रतिनिधी)- सर्वसामान्य कामगारांच्या हितासाठी सातत्याने संघर्ष करुन त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी कार्यरत असलेल्या स्वराज्य माथाडी व जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष योगेश गलांडे यांना शहरात कामगार भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.
युवा ग्रामीण पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या सन्मान सोहळा कार्यक्रमात गलांडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्य अग्निशमन अधिकारी शंकर मिसाळ, सहाय्यक उपनिरीक्षक, रामदास ताठे खरेदी-विक्री संघाचे बाबासाहेब काळे आदी पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
योगेश गलांडे माथाडी व जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगार वर्गाला न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी संघर्ष करत आहे. एमआयडीसी मधील अनेक कामगारांना कामगार कायद्याप्रमाणे त्यांचे हक्क मिळवून देण्याचे त्यांनी कार्य केलेले आहे. माथाडी कामगारांच्या न्याय, हक्कासाठी ते सातत्याने कार्यरत आहे. त्यांच्या कामगार क्षेत्रातील समाज हिताच्या कामाची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.