बचत गटातील महिलांच्या विविध उत्पादनांना मागणी
सोडत पध्दतीने महिलांना बक्षिसांचे वितरण
नगर (प्रतिनिधी)- दिवाळीनिमित्त बचत गटातील महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी संग्राम फाऊंडेशन, मृत्युंजय फाउंडेशन व सावित्री शक्तीपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू टिळक रोड येथील माऊली मंगल कार्यालयात झालेल्या अपना बजार शॉपिंग फेस्टिवलला महिला वर्गाचा प्रतिसाद लाभला.
अपना बजार शॉपिंग फेस्टिवलचे शुभारंभ पोलीस उपनिरीक्षक तथा धावपटून पूजा वराडे यांच्या हस्ते झाले. यावेळी रेणुका पुंड, श्रद्धा जाधव, सावित्री शक्तीपीठच्या अध्यक्षा कल्याणी गाडळकर, उपाध्यक्ष किरण कोतवाल, अपना बजारचे संस्थापक अकिज सय्यद, मृत्युंजय फाउंडेशनचे संस्थापक रवी भोसले आदींसह बचत गटातील महिला उपस्थित होत्या.
दोन दिवसीय अपना बजारला महिलांचा प्रतिसाद लाभला. शॉपिंग फेस्टिवलमध्ये विविध दिवाळीनिमित्त लागणारे साहित्य, रांगोळी पासून सजावटीचे साहित्यापासून फराळाच्या पदार्थापर्यंत स्टॉल लावण्यात आले होते. घरगुती पध्दतीने बचत गटांनी तयार केलेले पणत्या, आकाश कंदील, तसेच महिला व लहान मुलांचे कपडे, खाद्य पदार्थांचे स्टॉलचा समावेश होता.
पूजा वराडे यांनी महिलांनी महिलांसाठी घेतलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. तर बचत गटातील महिलांच्या उत्पादनांना चालना देण्यासाठी अशा पध्दतीने शॉपिंग फेस्टिवलची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांसाठी यावेळी सोडत पध्दतीने आकर्षक बक्षिसांचे वाटप करण्यात आले. शॉपिंग फेस्टिवलमध्ये सहभागी झालेल्या बचत गटातील महिला स्टॉलधारकांचा सत्कार करण्यात आला.