भीक नको, संरक्षण हवे! च्या घोषणा देऊन राज्य सरकारचा निषेध
राष्ट्रवादी काँग्रेसचे जोरदार निदर्शने
अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात शाळकरी विद्यार्थिनीपासून ते महिलांना सुरक्षिततेची हमी देण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या महिला व युवतींनी जोरदार निदर्शने करुन राज्य सरकारचा निषेध नोंदविला. भीक नको, संरक्षण हवे! च्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला.

राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या प्रदेश सचिव (संघटक) विद्या गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चाची सुरुवात महापालिका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन करण्यात आली. महिलांना संरक्षणाची मागणी करणारे व सरकारचा निषेध नोंदविणारे फलक हातात घेऊन महिला वर्ग मोर्चात सहभागी झाले होते. छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरुन पायी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात जोरदार घोषणाबाजी करुन महिलांनी संरक्षणासाठी आक्रोश केला. या मोर्चात ओबीसी सेलच्या प्रदेश सचिव विद्या गाडेकर, प्रियंका साळवे, फरीन शेख, प्रदेश सचिव विनोद साळवे, शिवाजीराव मडके, विलासराव राहिंज, रुकय्या शेख, विमल गांगर्डे, अलका ससाणे, हिराबाई खरात, शामराव वाघस्कर, सतीश गंधाक्ते, श्रीधर शेलार, सागर गायकवाड, सुभाष ठाकरे आदींसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
देशामध्ये विविध शहरात वारंवार महिला व मुलींवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. दुर्दैवाने या घटना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात घडण्यास सुरुवात झाली आहे. बदलापूर येथील शाळेत एका चिमुकलीवर झालेला अत्याचार हा मनाला होरपळून लावणार आहे. याच महिन्यात पुणे, अकोला, मुंबई, लातूर, नाशिक, नागपूर, कोल्हापूर या ठिकाणी देखील महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. बदलापूर येथे जी घटना घडलेली आहे, त्या घटनेचा जिल्हा ठाणे आहे. ठाणे हा जिल्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड असल्याचे मानले जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गडातच महिला सुरक्षित नसल्याची भावना महाराष्ट्राच्या माता-भगीनींच्या मनात निर्माण झाली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सध्या महाराष्ट्रात घडणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमुळे विद्यार्थिनी महाविद्यालयांमध्ये जाण्यास घाबरत आहे. इतर महिला देखील बसने प्रवास करण्यास हिम्मत करत नसल्याचे निदर्शनास येत आहे. जिल्ह्यासह राज्यातील महिलांना असुरक्षित असल्याचे जाणवत आहे. त्यांच्या मनातील भिती काढण्यासाठी जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय या ठिकाणी विद्यार्थिनींना एक तासाचे समुपदेशन करण्याच्या सूचना सर्व शाळा व महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांना लेखी पत्राद्वारे द्याव्या. महिला सुरक्षित असल्याची हमी देण्यासाठी जिल्हाधिकारी किंवा जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी संयुक्तरीत्या पत्रकार परिषद घेऊन महिलांना प्रशासन महिलांच्या सोबत सुरक्षिततेसाठी तैनात असून जिल्ह्यातील महिला सुरक्षित असल्याची हमी देण्याचे निवेदनात म्हंटले आहे.
शाळा व महाविद्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक करण्याचे लेखी सूचना त्वरित द्याव्या, शाळा व महाविद्यालयात भरोसा सेलची गाडी ही रोज न चुकता विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी तैनात करावी, या गाडीच्या तपासणीसाठी एक शिष्टमंडळ नेमावे, शाळा, महाविद्यालय व बस स्थानक येथे महिलांच्या सुरक्षिततेसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी करावा, बलात्कार व अत्याचाराच्या घटनेत पीडित असणाऱ्या महिलांना आर्थिक पुनर्वसनासाठी योजना राबवावी, जिल्ह्यातील अत्याचारग्रस्त महिलांच्या न्यायालयीन कामकाजासाठी वकिलांची एक समिती गठित करुन महिलांचे खटले मोफत चालवण्यास मदत करण्याचे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांना देण्यात आले. याप्रकरणी आठ दिवसांमध्ये सकारात्मक निर्णय न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना बांगड्या व साड्यांचा आहेर पाठवून मंत्रालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात लहान मुलींपासून ते जेष्ठ महिला सुरक्षित नाही. त्यांच्यावर वारंवार अत्याचाराच्या घटना घडत आहे. राज्य सरकारने महिलांना पैश्याचा लालच देण्यापेक्षा संरक्षणाची हमी द्यावी. बलात्कार प्रकरणाचे खटले तात्काळ फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशी द्यावी. बलात्कारींना फाशी मिळाल्यावर समाजात कायद्याचा धाक निर्माण होणार आहे. स्त्री, पुरुष समानता राहिली नसून, महिलांकडे वासनेच्या नजरेने पाहिले जाते, ही महाराष्ट्राला कलंकित करणारी गोष्ट आहे. शासन-प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, अन्यथा महिलांना कायदा हातात घ्यावा लागणार. – विद्या गाडेकर (प्रदेश सचिव, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ओबीसी सेल)
