युवतींना स्वसंरक्षणासह कायदेविषयक, आरोग्य आणि विम्याचे मार्गदर्शन
आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी महिलांना स्वसंरक्षणाचे धडे आवश्यक -प्रियंका खिंडरे (क्रीडा अधिकारी)
नगर (प्रतिनिधी)- आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी महिलांना स्वसंरक्षणाचे धडे आवश्यक झाले आहे. यामुळे स्वतःचे रक्षण करुन समोरच्या व्यक्तीचा उद्देश हाणून पाडता येतो. स्वसंरक्षणाचे धडे घेतल्यास आत्मविश्वास वाढून शारीरिक आणि मानसिक क्षमता विकसित होतात. महिला-युवतींना कोणत्याही धोक्यापासून स्वतःचे संरक्षण करण्याची शक्ती आणि क्षमता निर्माण करण्यासाठी स्वसंरक्षणाचे धडे घेणे, काळाची गरज बनली असल्याचे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय खेळाडू व क्रीडा अधिकारी प्रियंका खिंडरे यांनी केले.
जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा क्रीडा कार्यालय, नेहरु युवा केंद्र, अहिल्या फाउंडेशन, उडान फाउंडेशन, जय युवा अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वसंरक्षण प्रशिक्षण, कायदेविषयक मार्गदर्शन, आयुर्वेदिक सॅनिटरी नॅपकिन, विमा संरक्षण मार्गदर्शनावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा रुग्णालय संचलित शासकीय परिचर्या महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी क्रीडा अधिकारी खिंडरे बोलत होत्या. याप्रसंगी विशेष जिल्हा सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, ॲड. विद्या शिंदे, आरोग्य मार्गदर्शक आशिष घायवात, प्रज्ञा चव्हाण, विमा सल्लागार कांचन लद्दे, आंतरराष्ट्रीय मेकअप आर्टीस्ट कावेरी कैदके, राज्य क्रीडा मार्गदर्शक प्रवीण कोंढावळे, वाबळे सर, रजनी ताठे, प्रशांत पालवे, प्राचार्य वैशाली कोरडे, सुवर्णा कैदके, आरती शिंदे, अश्विनी वाघ, ॲड. महेश शिंदे आदीसह परिचर्या महाविद्यालयाच्या युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
आशिष घायवात यांनी सॅनिटरी नॅपकिन वापरताना कॉटन किंवा प्लास्टिक यातील फरक समजून घेतला पाहिजे. सध्या कमी खर्चातील प्लास्टिकयुक्त सॅनिटरी नॅपकिन वापरामुळे कॅन्सरचा धोका वाढत आहे. तर इतर अनेक आजार संभवतात. त्यामुळे महिलांनी पर्यावरण पूरक आयुर्वेदिक व कापूसचा समावेश असलेल्या सॅनिटरी नॅपकिन वापरण्याचे त्यांनी आवाहन केले.
सरकारी वकील ॲड. सुरेश लगड यांनी महिलांसाठी असणारे कायदे, पोटगी, कौटुंबिक हिंसाचार, विनयभंग, अत्याचार, संपत्ती मधील हिस्सा आदी कायद्याबाबत सविस्तर माहिती दिली. विमा सल्लागार कांचन मध्ये लद्दे यांनी कुटुंबाच्या स्वरक्षणासाठी आणि आरोग्यासाठी व जीवन मार्ग व्यवस्थीत चालवण्यासाठी विमा संरक्षण प्रत्येकाने घेतले पाहिजे. कोणतीही घटना वेळ व काळ सांगून येत नाही, त्यासाठी विमा कवच असणे आवश्यक आहे. जीवन हे अमूल्य आहे, त्यासाठी प्रत्येक कुटुंबातील सदस्याला विमा कवच असणे गरजेचे असल्यचे स्पष्ट करुन त्यांनी विमा धोरण विषयी माहिती दिली.
प्रशांत पालवे यांनी उपस्थित युवतींना स्वसंरक्षणाचे धडे प्रात्यक्षिकासह दिले. कावेरी कैदके यांनी युवतींना सौंदर्याबाबत शास्त्रोक्त माहिती, त्वचेची व केसांची काळजी व केमिकल विरहित योग्य सौंदर्य प्रसाधने याची माहिती देऊन, सौंदर्य क्षेत्रात करियर म्हणून उत्तम संधी असल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश शिंदे यांनी केले. आरती शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी आमसिद्ध सोलनकर, भाऊराव वीर, क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरांगे, विशाल गर्जे, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा समन्वय अधिकारी संकल्प शुक्ला, सिद्धार्थ चव्हाण, रमेश गाडगे, पोपट बनकर, दिनेश शिंदे, राजकुमार चिंतामणी, जयेश शिंदे, घनश्याम सानप, जयश्री शिंदे आदींचे मार्गदर्शन लाभले.