महिला दिनानिमित्त होम मिनिस्टरचा रंगला कार्यक्रम; पोस्टल महिला कर्मचाऱ्यांनी लुटला आनंद
योग्य संस्कार व संस्कृतीचा अवलंब करणाऱ्या महिला उच्च पदावरती काम करत आहेत- रामेश्वर ढाकणे
नगर ((प्रतिनिधी)- अहिल्यानगर मुख्य डाकघर येथे महिला दिनानिमित्त होम मिनिस्टरचा कार्यक्रम रंगला होता. विविध स्पर्धेने होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात महिला कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह संचारला होता. सर्व महिलांनी या कार्यक्रमात एकत्र येऊन स्त्री शक्तीचा जागर केला.
हेमंत खडकीकर वरिष्ठ डाक अधीक्षक अहिल्यानगर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. योग्य संस्कार व संस्कृतीचा अवलंब करून आज समाजात वावरणाऱ्या महिला आज उच्च पदावरती काम करत आहेत, जागतिक महिला दिनानिमित्त त्यांचा देश सेवा करणाऱ्या सर्व महिला कर्मचाऱ्यांच्या योग्य तो सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे असे प्रतिपादन अहिल्यानगर पोस्टल सोसायटीचे चेअरमन रामेश्वर ढाकणे यांनी व्यक्त केले. तसेच युनियनचे सेक्रेटरी प्रमोद कदम व सलीम शेख यांनी सर्व महिलांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. खासदार निलेश लंके यांनी फोनवरून महिला दिनाच्या शुभेच्छा देत, महिला कर्मचाऱ्यांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेतल्याबद्दल कौतुक केले.
वेगवेगळ्या उखाण्यांसहित महिलांच्या वारीने या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमास प्रारंभ झाला. यामध्ये रिंग फेकणे, फुगे उडवणे आणि नाव घेणे यांसारखे खेळ खेळले गेले. राजेंद्र टाक यांनी विविध स्पर्धा घेतल्या. रंगलेला हा खेळ पैठणीच्या कार्यक्रमात विविध स्पर्धेचा सामना करीत महिलांनी मनोरंजनात्मक खेळाचा आनंद लुटला. कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांना आकर्षक बक्षिसे प्रदान करण्यात आली. यामध्ये प्रथम क्रमांकाची पैठणी साडीचे बक्षीस श्रीमती ऋतुजा कराळे यांनी पटकाविले. तसेच द्वितीय क्रमांकाचे बक्षीस नीलिमा शुक्रे व प्रश्नमंजुषा या स्पर्धेमध्ये विविध महिलांना आकर्षक बक्षीसे देण्यात आली. या कार्यक्रमासाठी सर्व पोस्टल महिलां कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आगळावेगळा कार्यक्रम पोस्टल विभागामध्ये आयोजित निवृत्त महिलांसाठी हा एक मनोरंजनात्मक कार्यक्रम ठरला.
वरिष्ठ डाक अधीक्षक हेमंत खडकीकर म्हणाले की, प्रत्येक महिलेमध्ये विविध सुप्त कलागुण असतात. पण संसाराच्या जबाबदाऱ्या पेलविताना तिच्यामध्ये असलेले कलागुण कोमजतात. या कार्यक्रमातून तिच्या कलागुण वाव देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कुटुंब, नोकरी आणि विविध क्षेत्रात गुंतलेल्या महिलांना थोडा वेळ स्वतःसाठी मिळावा या उद्देशाने या कार्यक्रमाची रुपरेषा आखण्यात आल्याचे प्रमोद कदम यांनी स्पष्ट केले. तसेच या कार्यक्रमांमध्ये स्त्री शक्तीचा संदेश देण्यासाठी नृत्य सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रफुल्ल कुमार काळे यांनी केले. आभार गणेश केसकर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी पोस्टल कर्मचारी शुभांगी मांडगे, सपना चिलवर, रूपाली निसाळ, अश्विनी फुलकर, मोनाली हिंगे, अर्चना लांडे, सीमा कचरे, नीलिमा शेकटकर, ज्योती कांबळे, संयुक्ता पोळ, नमिता देशपांडे, स्मिता साखरे, शुभांगी सस्कर, स्मिता कुलांगे, शरद नऊसुपे, अजय आगळे, दत्तात्रय जासुद, रामराव धस, अजय खेडकर, सुखदेव पालवे, सागर कळगुंडे, संदीप मिसाळ, राजेंद्र गवते, संजय परभने, सुनील कुलकर्णी, शिवाजी कांबळे, विजय चाबुकस्वार, नितीन खेडकर, महेश टकले उपस्थित होते.