एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीने महिलांना जगण्याची नवी भरारी दिली – नवनाथ धुमाळ
नगर (प्रतिनिधी)- अबॅकस, वैदिक गणित व शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुमारे 42 वर्षांपासून कार्यरत असलेल्या व भारतासह 20 देशांत हजारो शाखा असलेल्या एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमी ने अबॅकस शिक्षिका बनवून हजारो महिलांना जगण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जीवनामध्ये उभ्या राहिलेल्या महिला समाज घडवत असतात, असे प्रतिपादन व्याख्याते नवनाथ धुमाळ यांनी केले.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आंम्ही हिरकणी सर करणार कर्तृत्वाचे एव्हरेस्ट! या महासोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रमुख व्याख्याते म्हणून धुमाळ बोलत होते.
दीप प्रज्वलन, प्रतिमापूजन व पाहुण्यांचे सत्कार संपन्न झाल्यानंतर प्रास्ताविकात मार्गदर्शिका कल्पना घडेकर यांनी सांगितले की, भारतातील सर्वात मोठी अबॅकस अकॅडमी उभी करत असताना हजारो महिलांनी यासाठी कष्ट व परिश्रम घेतले आहेत. त्यामुळे या महिला शिक्षकांच्या सुखदुःखात अकॅडमी सतत सहभागी होत असते. अकॅडमीसाठी अनेक वर्ष काम करून योगदान देणाऱ्या शिक्षिका स्व.उज्वला गाडेकर यांच्या कुटुंबीयांना सुमारे सव्वा लाख रुपयांचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अकॅडमीसाठी काम करणाऱ्या शिक्षिकांचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला.
व्याख्यानमालेतील तेजस्विनी आहेर (महिला व बाल समुपदेशिका) यांनी सुदृढ मानसिक आरोग्याद्वारे ध्येयपूर्ती या विषयावर महिलांची मने जिंकली. शबाना शेख (वन स्टॉप सेंटर- केंद्र प्रशासक) यांनी माझी संस्था माझे कौशल्य या विषयावर महिलांना मार्गदर्शन केले.
मान्यवरांच्या शुभहस्ते शिक्षिकांना स्टार टीचर, गॅलेक्सी टीचर आदी विविध पुरस्कारांनी व भेटवस्तूंनी गौरवण्यात आले. यानंतरच्या सत्रात संपन्न झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांत महिला शिक्षिकांनी आपले कलागुण सादर करून कार्यक्रम उंचीवर नेला. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. स्वागत अशोक घडेकर यांनी केले. आभार राधेश्याम घडेकर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमोल बागुल व पुनम सोनवणे यांनी केले.