कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतचे समाज कल्याण अधिकारी यांना निवेदन
चार महिने उलटून देखील कचरावेचक महिला लाभापासून वंचित
नगर (प्रतिनिधी)- ॲट्रॉसिटी कायदे अंतर्गत अत्याचारग्रस्तांना मिळणाऱ्या अर्थसहाय्याला विलंब होत असताना पिडीतांना तात्काळ अर्थसहाय्य मिळण्याची मागणी कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतच्या वतीने करण्यात आली आहे. संघटनेच्या शिष्टमंडळाने प्रभारी समाज कल्याण अधिकारी देवीदास कोकाटे यांची भेट घेऊन या मागणीचे निवेदन दिले.
ॲट्रॉसिटी कायदे अंतर्गत रामवाडी येथील पिडीत महिलांना चार महिने उलटून देखील अर्थसहाय्य मिळाले नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे यावेळी लक्ष वेधण्यात आले. याप्रसंगी संघटनेचे जिल्हा समन्वयक विकास उडानशिवे, ज्योती घोडके, प्रमिला घोडके, कविता घोरपडे, सुशीला भालेराव, कुंदा अडागळे, नंदा इंगळे, सुमन वाघमारे, लता तिजोरे, ज्योती शेलार, कुसुम वडागळे, ताराबाई काते, उषा वडागळे, अनुसया वाघमारे, सुमन वाघमारे आदी उपस्थित होते.
चार महिन्यांपूर्वी नागापूर कॉटेज कॉर्नर परिसरामध्ये सुका कचरा गोळा करणाऱ्या रामवाडी येथील प्रमिला घोडके, ज्योती घोडके, कविता घोरपडे या कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतच्या सभासदांना बेदम मारहाण करून जातीयवादी शिवीगाळ करण्यात आली. त्यानुसार संबंधित पोलीस स्टेशनमध्ये मारहाण करणाऱ्या व जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संघटनेच्या वतीने पिडीतांना अर्थसहाय्य मिळण्यासाठी कागदपत्रे कार्यालयाकडे त्याच वेळेस जमा केलेली आहे. गंभीर मारहाण झालेल्या महिला दोन ते अडीच महिने घरामध्ये झोपून होत्या. आजही त्यांना काम करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. अर्थसहाय्य मिळत नसल्याबाबत विचारणा करणाऱ्या कष्टकरी, कामगार महिलांना कर्मचारी उद्धटपणे वागणूक देऊन उडवाउडवीची उत्तरे देत असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली.
शासनामार्फत मिळणारे अर्थसहाय्य पिडीत महिलांना अजून मिळालेले नाही. महिलांवर उपचार सुरु असताना 50% अर्थसाह्य मिळणे अपेक्षित होते, परंतु चार महिने उलटून देखील कुठल्याही प्रकारची मदत समाज कल्याण विभागाकडून पिडीत महिलांना मिळालेली नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.