आशा सरोदे यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
आरोपी व कोतवालीचे पोलीस निरीक्षक यांच्यातील संबंधाची चौकशी करण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- अनेक गंभीर गुन्ह्यात फरार असलेला आरोपी ओंकार घोलप याला पाठिशी घालणाऱ्या कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्यात असलेल्या संबंधाची चौकशी करावी व कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी संबंधीत पोलीस निरीक्षकाचे निलंबन करण्याची मागणी नुकतेच जीव घेणा हल्ला झालेल्या बबलू सरोदेच्या आईने पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आशा सरोदे यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, कुख्यात गुंड ओंकार घोलप मागील तीन महिन्यांपासून कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत वावरत असून, त्याला कोतवाली पोलीसांनी अटक केलेली नाही. कोतवालीचे गोपनीय विभागातील अधिकाऱ्यांबरोबर हॉटेलमध्ये पार्टी, फोटोसेशन व वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभाग करताना दिसत होता. जीवे मारण्याचा प्रयत्न व इतर कलमाखाली कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये घोलपवर गुन्हा दाखल आहे. त्याचा जामीन 16 सप्टेंबर रोजी न्यायालयाने फेटाळलेला आहे. परंतु तरीही कोतवालीच्या पोलीस निरीक्षकांनी त्याला अटक न करता कर्तव्यात कसुर केला असल्याचा आरोप सरोदे यांनी केला आहे.
घोलप कोतवालीच्या पोलीस स्टेशनच्या मागील बाजूस राहण्यासाठी आहे. तर पोलीस स्टेशन परिसरातूनच जाण्या-येण्याचा वावर आहे. त्याच्यावर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. ज्या गुन्ह्यामधून त्याला जामीन फेटाळण्यात आला, तो गुन्हाही कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील आहे. या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हे आरोपीला पाठीशी घालत आहे. घोलप व त्याच्या साथीदाराने 2 डिसेंबर रोजी माझा मुलगा बबलू सरोदे याच्यावर जीवघेणा हल्ला केला. तो आज मृत्यूच्या दारात उभा आहे. त्याला वेळीच अटक झाली असती तर, हा प्रसंग ओढवला गेला नसल्याचे स्पष्ट करुन आशा सरोदे यांनी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व आरोपी ओंकार घोलप यांच्यातील संबंधाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.