राज्यस्तरीय तालुका पत्रकार संघ अध्यक्ष मेळावा व आदर्श तालुका पत्रकार पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी पत्रकार रवाना
पत्रकारांच्या प्रश्नाबरोबर सामाजिक प्रश्न घेऊन देखील परिषदेचा लढा -एस.एम. देशमुख
नगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने सेलू (जि.परभणी) येथे आयोजित राज्यस्तरीय तालुका पत्रकार संघ अध्यक्ष मेळावा व आदर्श तालुका पत्रकार पुरस्कार प्रदान सोहळ्यात सहभागी होण्यासाठी निघालेल्या पुणे ते सेलू पत्रकार एकता रॅलीचे अहिल्यानगर शहरात जिल्ह्यातील पत्रकारांच्या वतीने स्वागत करण्यात आले.
परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या रॅलीत सहभागी असलेले पदाधिकारी, सहकारी व पत्रकारांचा नगर-पुणे महामार्गावरील सीएसआरडी महाविद्यालया समोर स्वागत करण्यात आले. सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्वागत कार्यक्रमाप्रसंगी परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, विश्वस्त शरद पाबळे, कोषाध्यक्ष मन्सूर शेख, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा आदींसह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना एस.एम. देशमुख म्हणाले की, ग्रामीण भागातील तालुका पत्रकार सामाजिक भान ठेवून उत्कृष्ट कार्य करत आहे. मात्र त्यांच्या कार्याची दखल घेतली जात नाही. त्यांचे चांगले काम संपूर्ण राज्यात घेऊन जाण्यासाठी परिषदेने हा व्यासपिठ निर्माण केला आहे. चांगले काम करणाऱ्या ग्रामीण पत्रकारांना पुरस्काराच्या माध्यमातून शाबासकीची थाप दिली जात आहे. सलग बारा वर्षे हा उपक्रम सातत्याने सुरू आहे. गेल्या वर्षी नगर जिल्ह्याला पुरस्कार देण्यात आला होता. अत्यंत तटस्थ पध्दतीने पुरस्कार निवड समिती काम करत आहे. राज्यातील 9 विभागात 9 तालुके व 1 जिल्ह्याला पुरस्कार दिला जातो. सेलू येथे हजारोंच्या संख्येने पत्रकारांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डिजिटल मीडिया परिषदेची विंग सुरू करून परिषदेने आपली ताकद वाढवली आहे. महाकुंभ मेळाव्यातील चेंगराचेंगरीची बातमी नॅशनल चॅनलवाले प्रसारीत करत नव्हते, सर्वप्रथम या बातम्या स्थानिक यू ट्युब चॅनल्सनी प्रसारित केल्या व या घटनेची सर्व मीडियाला दखल घ्यावी लागली. भविष्यातील डिजिटल मीडियाची बलस्थाने ओळखून वाटचाल करावी लागणार असून, या मीडियाकडे दुर्लक्ष करून चालता येणार नसल्याचे देशमुख यांनी सांगितले.
मराठी पत्रकार परिषदचे महाराष्ट्रासह दिल्ली, गोवा, कर्नाटक, गुजरात मध्ये देखील शाखा असून, पत्रकारांच्या प्रश्नाबरोबर सामाजिक प्रश्न घेऊन देखील परिषद लढत आहे. मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न देखील परिषदेच्या माध्यमातून सोडविण्याचे काम करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर दरवर्षी परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त एकाच दिवशी हजारोंच्या संख्येने पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्य तपासणीची माहिती दिली.
डॉ. सुरेश पठारे म्हणाले की, मराठी पत्रकार परिषद पत्रकारांना एकत्र करून त्याचे योग्य नियंत्रण करत आहे. त्यांचे प्रश्न सोडवून पत्रकारांचे चांगले काम समाजापर्यंत घेऊन जाण्याचे कार्य करत आहे. पत्रकारितेला बळकटी देऊन समाजाला दिशा देण्याचे काम होत आहे. पत्रकारिता व्यवसाय करणाऱ्या पत्रकारांना संरक्षण देऊन, पत्रकारितेचा धंदा मांडणाऱ्यांवर देखील वचक बसविण्याचे काम केले जात आहे. चांगले काम करणाऱ्या ग्रामीण पत्रकारांना पुरस्काररुपाने प्रोत्साहन देण्याचे परिषदेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. आभार परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुर्यकांत नेटके यांनी मानले. राज्य प्रसिद्धी प्रमुख संदीप कुलकर्णी व डिजिट मीडीया परिषदेचे जिल्हाध्यक्ष आफताब शेख यांनी सर्वांचे स्वागत केले.