मागील अनेकवर्षापासूनचा सुटेना प्रश्न; आपचे महापालिका प्रशासनाला निवेदन
आठ दिवसांत तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन -भरत खाकाळ
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहराच्या प्रभाग क्रमांक 7 मधील बालिकाश्रम रोड, भिंगारदिवे मळा या भागात मागील अनेक वर्षांपासून महानगरपालिकेच्या पिण्याच्या पाण्याबाबत गंभीर समस्या निर्माण झालेली असताना आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिकेत जाऊन पाणीपुरवठा विभागात निवेदनाद्वारे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. यावेळी आपचे शहर जिल्हाध्यक्ष भरत खाकाळ, महिला आघाडीच्या अध्यक्षा ॲड. विद्याताई शिंदे, महासचिव दिलीप घुले, संघटक मंत्री रवी सातपुते, युवा उपाध्यक्ष विजय लोंढे आदी उपस्थित होते.
भिंगारदिवे मळा या भागात काही ठिकाणी पाणी अजिबात येत नाही, तर काही ठिकाणी अत्यंत कमी दाबाने पाणी येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पाण्यासाठी नागरिकांन मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पाणी हा जनतेचा मूलभूत हक्क आहे. त्यावर कुठलाही तडजोड चालणार नाही. पुढील आठ दिवसांच्या आत जर नागरिकांच्या समस्या सुटल्या नाहीत, तर आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिष्टमंडळाने दिला आहे.
आपचे शहर जिल्हाध्यक्ष भरत खाकाळ यांनी सांगितले की, या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज त्रास सहन करावा लागतो. काही ठिकाणी पाईपलाइन जुनी झाली असून, काही ठिकाणी वॉलचे कार्य नीट होत नाही. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. या समस्या कायमस्वरूपी दूर व्हाव्यात म्हणून संबंधित विभागाने सर्व पाइपलाइन आणि वॉल तपासून तात्काळ दुरुस्त करण्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महिला आघाडीच्या अध्यक्षा ॲड. विद्या ताई शिंदे यांनी सांगितले की, पाण्याच्या समस्येचा महिलांना सर्वाधिक त्रास होत आहे. काही घरांमध्ये दिवसन्दिवस पाणी येतच नाही. महिलांना घरकाम, मुलांच्या देखभालीसाठी पाण्याची तारेवरची कसरत करावी लागते. काही वेळा नागरिकांना पाणी आणण्यासाठी लांबवर जावे लागते. या परिस्थितीने लोकांचा संयम सुटला असल्याचे ते म्हणाल्या.
निवेदनात पाईपलाइनची तपासणी, वॉल दुरुस्ती, पुरेसा पाणीदाब निर्माण करणे, तसेच नियमित पाणीपुरवठा राखणे या मागण्या करण्यात आल्या आहेत.