फिनिक्स सोशल फाउंडेशनची आगळी-वेगळी मतदार जागृती
नेत्रशस्त्रक्रियेनंतर ज्येष्ठांचा मतदानाचा संकल्प
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक संस्थांकडून मतदार जागृतीचे उपक्रम राबविले जात असताना, फिनिक्स सोशल फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी जपत एक आगळा-वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या पुढाकाराने मोफत नेत्र तपासणी शिबिर व मोतीबिंदू शस्त्रक्रियेच्या माध्यमातून नवदृष्टी मिळालेल्या ज्येष्ठ नागरिक व महिलांना मतदानाचे कर्तव्य बजावण्याचे आवाहन करण्यात आले.
नागरदेवळे (ता. नगर) येथे नुकतेच आयोजित करण्यात आलेल्या या मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरास महिलांसह ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराच्या माध्यमातून मोतीबिंदू व काचबिंदूग्रस्त रुग्णांची तपासणी करून, त्यांची मोफत शस्त्रक्रिया पुणे येथील के. के. आय. बुधराणी रुग्णालयात यशस्वीरीत्या करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर दृष्टी परत मिळालेल्या रुग्णांचे शहरात आगमन होताच फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी नवदृष्टी मिळालेल्या ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत, या नव्या दृष्टीचा उपयोग केवळ स्वतःच्या जीवनातच नव्हे, तर लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावण्यासाठीही करावा, असे आवाहन केले. “मतदान हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आणि कर्तव्य आहे. नवदृष्टीतून चांगला, प्रामाणिक आणि विकासाभिमुख उमेदवार निवडण्यासाठी सर्वांनी मतदान करावे,” असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिक व महिलांनीही मिळालेल्या नवदृष्टीतून योग्य उमेदवाराची निवड करून मतदानाचा हक्क बजावण्याचा निर्धार व्यक्त केला. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील दृष्टीहीन व अल्पदृष्टीग्रस्त रुग्णांना दृष्टी मिळावी, यासाठी फिनिक्स सोशल फाउंडेशनने जिल्हाभरात एक व्यापक सामाजिक चळवळ उभी केली आहे. या उपक्रमांतर्गत सर्वसामान्य नागरिकांसाठी नियमितपणे मोफत नेत्र तपासणी शिबिरे तसेच मोतीबिंदू व काचबिंदूच्या मोफत शस्त्रक्रिया आयोजित करण्यात येतात. शहरात मोठ्या संख्येने ज्येष्ठांवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या असून, त्यांना देखील मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.
आरोग्यसेवेबरोबरच सामाजिक जाणीव जागृत करण्याच्या हेतूने फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून मतदार जागृतीचेही उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी दिली. समाजातील प्रत्येक घटकाने लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
