वृक्षरोपण करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश; विद्यार्थ्यांना मतदार मार्गदर्शक पुस्तिकांचे वाटप
युवकांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवून लोकशाही बळकट करावी -पै. नाना डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे गणेशोत्सवानिमित्त नेहरु युवा केंद्र व जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने नवनाथ विद्यालयात मतदार जागृती अभियान राबविण्यात आले. तर वृक्षरोपण करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
या अभियानात मतदार यादीत नांव समाविष्ट करणे व मतदान करण्याबातची मार्गदर्शक पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. तर नाव मतदार यादीत नोंदवणे, नाव दुरुस्ती आदी संदर्भात युवकांना मार्गदर्शन करण्यात आले.

पै. नाना डोंगरे म्हणाले की, युवकच सामाजिक क्रांती घडवू शकतात. आजची युवाशक्ती हीच आपल्या देशाची सर्वात मोठी राष्ट्रशक्ती असून, युवकांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवून लोकशाही बळकट करावी. मतदानाचा पवित्र हक्क राष्ट्रीय कर्तव्य म्हणून बजाविण्याचे त्यांनी आवाहन केले. सर्वांना ऑक्सिजनरुपाने जीवन देणाऱ्या झाडांना जगविण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. या उपक्रमासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीपराव दिघे व नेहरु युवा केंद्राचे उपनिदेशक शिवाजी खरात यांचे मार्गदर्शन लाभले.
