‘आम्ही जाणार मतदानाला, तुम्हीपण चला!’
मतदार ओळखपत्रासह कुटुंबीयांची सेल्फी; नागरिकांना मतदानाचे आवाहन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महापालिका निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढविणे व नागरिकांमध्ये लोकशाही प्रक्रियेबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाचा साहित्यरत्न लोकशाहिर डॉ. अण्णा भाऊसाठे पुरस्कार प्राप्त सुनिल सकट व त्यांच्या कुटुंबीयांनी एक आगळा-वेगळा उपक्रम राबवून मतदार जागृती केली. मतदार ओळखपत्र हातात धरून संपूर्ण कुटुंबीयांनी एकत्रित सेल्फी काढत, ‘आम्ही जाणार मतदानाला, तुम्हीपण चला!’ असा संदेश दिला.
या उपक्रमाच्या माध्यमातून सकट परिवाराने नालेगाव परिसरात जनतेशी संवाद साधत मतदान हा केवळ अधिकार नसून तो प्रत्येक नागरिकाचा संविधानिक हक्क आणि नैतिक कर्तव्य असल्याचे ठामपणे सांगितले. गुरुवारी (दि. 15 जानेवारी) होणाऱ्या मतदानासाठी प्रत्येकाने घराबाहेर पडून आपला हक्क बजावावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या प्रसंगी सौ. वंदना सकट, कु. आरती सकट, प्रसाद सकट, सुशिलाबाई सकट, अरुण सकट, सुधीर सकट आदी कुटुंबीय उपस्थित होते.
सुनिल सकट म्हणाले की, “भारत ही जगातील सर्वात मोठी आणि सक्षम लोकशाही आहे. लोकशाहीची खरी ताकद ही मतदारांच्या सहभागावर अवलंबून असते. महापालिका निवडणूक हा केवळ मतदानाचा दिवस नसून तो लोकशाहीचा उत्सव आहे. शहराच्या विकासासाठी, सशक्त आणि जबाबदार नेतृत्व निवडून देण्यासाठी प्रत्येक नागरिकाने हिरीरीने या प्रक्रियेत सहभागी होणे अत्यंत आवश्यक आहे.”
“मतदान न करणे म्हणजे आपल्या हक्कांपासून स्वतःला वंचित ठेवण्यासारखे आहे. आपण मतदानातूनच आपल्या शहराचा, परिसराचा आणि पुढील पिढीचा विकासाचा मार्ग ठरवत असतो. पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधांबाबत निर्णय घेणारे प्रतिनिधी निवडण्याची ताकद आपल्याकडे आहे. त्यामुळे एकही मत वाया जाऊ नये.” लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी मतदानाचे प्रमाण वाढणे अत्यावश्यक असल्याचे सांगत त्यांनी युवक, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना विशेषतः मतदानासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.
