प्रदेशाध्यक्ष आमदार राम पंडागळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान
‘गाव तेथे शिवसेना शाखा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविणार -विनोद साळवे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या अहिल्यानगर दक्षिण जिल्हाप्रमुखपदी विनोद साळवे यांची निवड करण्यात आली आहे. सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा. आमदार राम पंडागळे यांच्या हस्ते साळवे यांना नियुक्तीपत्र देऊन अधिकृतरित्या जबाबदारी सोपविण्यात आली. यावेळी नवनियुक्त जिल्हाप्रमुख विनोद साळवे यांचा सत्कार करण्यात आला.
विनोद साळवे हे उच्चशिक्षित, अभ्यासू व्यक्तिमत्त्व असून, ते आंबेडकरी चळवळीतील एक अनुभवी कार्यकर्ते आहे. समाजातील उपेक्षित, वंचित व गरजू घटकांसाठी सातत्याने कार्य करत आहेत. यापूर्वी छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असताना त्यांनी अनेक आंदोलने, उपोषणे, रस्ता रोको आंदोलनांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडले व सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
तसेच जनकल्याण बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक, शैक्षणिक व जनजागृतीचे कार्य सुरू ठेवले असून त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. विनोद साळवे यांनी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून ‘गाव तेथे शिवसेना शाखा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. तर शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी समाजातील गरीब व दुर्बल घटकांसाठी राबवलेल्या विविध लोककल्याणकारी योजना तळागाळातील गरजू नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सामाजिक न्याय विभाग प्रभावी भूमिका बजावेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
नवनियुक्त जिल्हाप्रमुख विनोद साळवे यांचे अहिल्यानगर दक्षिण विभागाचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, बाबूशेठ टायरवाले, शहरप्रमुख सचिन जाधव, उपजिल्हाप्रमुख आनंदराव शेळके यांच्यासह शिवसेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून त्यांना भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.
