• Tue. Nov 4th, 2025

विखे यांनी पराभवाची हॅट्रिक स्वीकारण्याची तयारी ठेवावी -ॲड. सुरेश लगड

ByMirror

Sep 25, 2024

विखे कुटुंबीयांनी जाहीर सत्तामारी करून सातत्याने पक्षांतर केल्याचा आरोप

अहमदनगर (प्रतिनिधी)- सत्तामारीत अग्रणी असलेल्या विखे कुटुंबांचे वंशज डॉ. सुजय विखे संगमनेर विधानसभा मतदारसंघात लढण्याची भाषा करतात त्यातून त्यांनी आता माघार घेऊ नये आणि पराभवाची हॅट्रिक स्वीकारण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन जेष्ठ विधीज्ञ ॲड. सुरेश लगड यांनी केले आहे.


बैल जोडी, गाय वासरू, हाताच्या चिन्हावर विखे कुटुंबाने 50 वर्षे सत्ता उपभोगली, परंतु ज्या वेळेला त्यांना सत्ता जाण्याची चाहूल लागली त्यावेळेस त्यांच्या कुटुंबीयांनी जाहीर सत्तामारी करून पक्षांतर केले. मागे शिवसेनेचे मंत्री म्हणून केंद्रात आणि राज्यात सत्ता उपभोगली आणि अशी सत्ता त्या पक्षाकडे राहणार नाही असे दिसल्याबरोबर उडी मारून सत्तामारी विखे कुटुंबांच्या प्रमुखांनी केली असल्याचा आरोप ॲड. लगड यांनी केला आहे.


पाच वर्षे खासदार राहून सुद्धा अहमदनगर दक्षिण मतदार संघाचा काही एक विकास डॉ. सुजय विखे यांना करता आलेला नाही. आई जिल्हा परिषद अध्यक्षा आणि वडिल मंत्री असताना सुद्धा फक्त लोकांचा वापर करायचा आणि वापर संपला की फेकून द्यायचे, अशी प्रवृत्ती विखे यांनी सातत्याने जोपासली. त्याचा परिणाम त्यांच्या विरुद्ध डीच्चू फत्ते जनतेने केला. परंतु त्यातून विखे कुटुंबीय काही एक शिकले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


संगमनेर मतदारसंघात बाळासाहेब थोरात यांनी त्यांचे दिवंगत वडिल भाऊसाहेब थोरात यांचे प्रचंड काम आहे. दुष्काळी संगमनेर मतदारसंघाला चांगले दिवस त्यांनी आणले आहे. लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती या तत्त्वाचा वापर बाळासाहेब थोरात आणि भाऊसाहेब थोरात यांनी मतदारसंघासाठी केला. त्यामुळे बाळासाहेब थोरात यांचा पराभव त्या मतदारसंघातील जनता होऊ देणार नाही, याची जाण विखे पिता-पुत्रांना नाही. अहमदनगर दक्षिण मतदार संघात झालेल्या पराभव विखे कुटुंबाला सहन करता आलेला नाही. त्यातून त्यांनी संगमनेर मतदारसंघात डरकाळ्या सुरू केल्या आहेत, परंतु जनतेच्या पैशाचा वापर मतदारांना खरेदी करण्यासाठी यापुढे त्यांना अजिबात करता येणार नाही. त्यांच्याविरुद्ध जय शिवाजी जय डिच्चू कावा जारी करण्यात आला आहे. त्यांनी पराभव स्वीकारण्याची मानसिकता आज पासून ठेवावी, असे ॲड. लगड यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *