अहमदनगर (प्रतिनिधी)- सैनिकनगर येथील विजय भीमराव गाडेकर यांची विनयभंगाच्या गुन्ह्यातून न्यायालयाने (न्यायदंडाधिकारी कोर्ट नं.4) निर्दोष मुक्तता केली. एका महिलेने त्यांच्यावर घरात येवून विनयभंग केल्याचा भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला 2019 मध्ये गुन्हा दाखल केला होता. तब्बल 5 वर्ष न्यायालयात चाललेल्या प्रकरणात गाडेकर यांना दिलासा मिळाला आहे.
विजय गाडेकर गुन्हा दाखल होण्यापूर्वी एका संस्थेच्या आश्रम शाळेवर शिपाई म्हणून कार्यरत होते. संस्था चालकाने त्यांना नोकरी लावतो म्हणून पैसे उकळले. तब्बल सहा वर्षे त्यांनी बिनपगरी सेवा बजावली, पण पगार काही सुरू झाला नाही. त्यांनी पैशासाठी संस्थाचालकाकडे तगादा लावला, मात्र त्या संस्था चालकाने पैसे देण्यास टाळाटाळ केली. एक दिवस त्या संस्था चालकाने पैसे घेवून जाण्यासाठी गाडेकर यांना घरी बोलावून घेतले. ते घरी गेल्यावर त्यांना मारहाण करुन संस्था चालकाच्या पत्नीने त्यांच्यावर 14 मे 2019 रोजी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी 19 ऑगस्ट 2019 रोजी न्यायालयात दोषारोपपत्र पोलीसांनी दाखल केले. गाडेकर यांनी सदर संस्था चालकाने नोकरी लावून देण्याचे अमीष दाखवून अनेक शिक्षकांचे पैसे उकळून फसवणुक केलेली असल्याचे पोलीस प्रशासनाद निदर्शनास आणून दिल्याने फसवणुक झालेल्यांनी त्या संस्थाचालकावर गुन्हा देखील दाखल केला होता. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
फसवणुक झाल्यावर पैश्याचा तगादा लावल्याने संस्था चालकाच्या पत्नीने त्यांना गुन्ह्यात अडकविल्याचा युक्तीवाद आरोपीच्या वकिलांनी केला. हा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायाधीश अश्विनी पाटील यांनी 13 फेब्रुवारी 2024 रोजी गाडेकर यांची विनयभंगाच्या गुन्ह्यातून निर्दोष सुटका केली. आरोपीच्या वतीने ॲड. सुनिल तोडकर यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. महेश शिंदे यांनी सहकार्य केले.