अभिनेते तेजस बर्वे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
नगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते तथा वृक्षमित्र विजय भालसिंग यांना सामाजिक, धार्मिक व पर्यावरण क्षेत्रात सुरु असलेल्या निस्वार्थ कार्याबद्दल भारत गौरव सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुणे येथील पत्रकार भवन येथे समृद्धी प्रकाशनचे डॉ.प्रा.बी.एन. खरात, शांताई फाऊंडेशन पुणे व हिरकणी महिला विकास संस्था, कोरेगाव भिमा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात अभिनेते तेजस बर्वे यांच्या हस्ते भालसिंग यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते .
विजय भालसिंग सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, निसर्ग व पर्यावरण क्षेत्रात गेल्या दोन दशकापासून योगदान देत आहेत. वाळकी (ता. नगर) येथील असलेले भालसिंग एसटी बॅकेची नोकरी सांभाळून निस्वार्थपणे कार्यरत असून, कोणत्याही प्रकारचे शासकीय अनुदान व वर्गणी न घेता स्वखर्चातून सामाजिक कार्य करत आहे. वृक्षरोपण व संवर्धनासाठी ते सातत्याने योगदान देत आहे.
उन्हाळ्यात पशु-पक्ष्यांना जगणे सुसह्य व्हावे म्हणून पाणवठे तयार करुन पाणी उपलब्ध करणे, विविध परिसरात पक्ष्यांसाठी झाडांवर धान्य व पाण्याची भांडी बसविणे, सर्वत्र वाढत चाललेल्या सिमेंटच्या जंगलामुळे पशु-पक्ष्यांचे अस्तित्व राहण्यासाठी नारळाच्या साली पासून कृत्रिमरीत्या पक्ष्यांसाठी बनवलेले घरटी बसविणे आदी निसर्ग व पर्यावरणपुरक उपक्रम ते सातत्याने राबवित आहेत. दरवर्षी आषाढी वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीची सेवा करत आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना पुणे येथील मानाचा भारत गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यापूर्वी देखील भालसिंग यांना सामाजिक क्षेत्रातील निस्वार्थपणे केलेल्या कार्याची दखल घेऊन अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. भालसिंग यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.