सर्वसामान्य कुटुंबातून आलेले भालसिंग व खजिनदार यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला -रोहिदास महाराज जाधव
नगर (प्रतिनिधी)- जेऊर बायजाबाई (ता. नगर) येथे सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांना कोल्हापूर येथे ग्रेट महाराष्ट्र गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल व चंद्रकांत खजिनदार यांची गावकामगार पोलीस पाटील संघ अहिल्यानगरच्या दक्षिण जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
गावातील श्री सिद्धनाथ दत्त मंदिराच्या सभा मंडपात माजी नायब तहसिलदार ह.भ.प. रोहिदास महाराज जाधव व कलावती जाधव यांच्या हस्ते भालसिंग व खजिनदार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुदाम महाराज दारकुंडे, सोमनाथ महाराज शिंदे, कांदा व्यापारी नितीनशेठ पवार आदी उपस्थित होते.
ह.भ.प. रोहिदास महाराज जाधव म्हणाले की, सर्वसामान्य कुटुंबातून आलेले भालसिंग व खजिनदार यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. एसटी बॅकेची नोकरी सांभाळून भालसिंग यांचे निस्वार्थपणे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, निसर्ग व पर्यावरण क्षेत्रात सुरु असलेले कार्य प्रेरणादायी आहे. कोणत्याही प्रकारचे शासकीय अनुदान व वर्गणी न घेता त्यांनी उभे केलेले सामाजिक कार्य दिशादर्शक आहे. तर चंद्रकांत खजिनदार देहरे (ता. नगर) गावात मागील 17 वर्षापासून पोलीस पाटील म्हणून कार्यरत आहे. त्यांनी सातत्याने पोलीस पाटील व ग्रामस्थांचे प्रश्न सोडविण्याचे काम केले असल्याचे त्यांनी सांगितले.
सुदाम महाराज दारकुंडे म्हणाले की, भालसिंग यांना मिळालेला पुरस्कार व खजिनदार यांची झालेली निवड अभिमानास्पद आहे. सामाजिक योगदान देऊन विविध क्षेत्रातील दोघांचे योगदान कौतुकास्पद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भालसिंग व खजिनदार यांनी सत्काराला उत्तर देताना झालेल्या सत्काराने आनखी कार्य करण्यास ऊर्जा मिळणार असल्याची भावना व्यक्त केली.