• Wed. Nov 5th, 2025

नगर-कल्याण रोडच्या विद्या कॉलनीला अखेर मिळाले रस्ते

ByMirror

Nov 15, 2023

नगरसेवक अनिल शिंदे यांच्या प्रयत्नाने नागरिकांना मिळाली रस्त्यांची दिवाळी भेट

प्रभागाची स्वच्छता ठेवणे व झालेले चांगले रस्ते सांभाळणे ही नागरिकांची जबाबदारी -खासेराव शितोळे

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-कल्याण रोड, प्रभाग क्रमांक 15 मधील विद्या कॉलनीला अखेर नगरसेवक तथा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांच्या प्रयत्नाने रस्त्यांचा प्रश्‍न मार्गी लागला. नुकतेच या कॉलनीत झालेल्या दोन ठिकाणच्या सिमेंट रस्ता काँक्रिटिकरण कामाचा लोकार्पण करण्यात आला. तर लवकरच प्रस्तावित रस्त्यांचे काम देखील मार्गी लावून याभागातील रस्त्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन नगरसेवक शिंदे यांनी देऊन नागरिकांना रस्त्यांची दिवाळी भेट दिली.
विद्या कॉलनी येथील रस्ता काँक्रिटिकरण लोकार्पण सोहळा माजी प्राचार्य खासेराव शितोळे यांच्या हस्ते पार पडला. तसेच या परिसरातील शिक्षण व विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या व्यक्तींचा नगरसेवक शिंदे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

यावेळी भाजपचे शहर सचिव दत्ता गाडळकर, पारुनाथ ढोकळे, विजय गाडळकर, संतोष दसासे, प्रा. भगवान काटे, अर्जुन भुजबळ, पंडितराव हराळ, बळीराम सातपुते, विनायक आडेप, दत्तात्रय कानडे, नवनीत गायकवाड, आशिष (मुन्ना) शिंदे, भालचंद्र फटांगरे, रामदास गायकवाड, भगवान शेंडगे, गोपीचंद लाटे, राजाराम रोहकले, बाळासाहेब निमसे, गवराम कदम, डॉ. अर्जुन ऊंडे, संतोष कोरडे, प्रशांत ठुबे, विजय कांडेकर, सुनीता कोरडे, प्रवीण शेरकर, गणेश डेरे, योगेश डेरे, राजेंद्र भुतकर, बाबासाहेब आंधळे, नितीन लबडे, सागर गांधी, प्रा. अनिल गवळी, राजाराम शेंडगे, संजय तिजोरे, बाजीराव चौधरी, अण्णासाहेब कोरडे, अण्णासाहेब सोनवणे, मारुती कुलट, संतोष निमसे, वसंत खोसे, बाबासाहेब महानवर, एकनाथ व्यवहारे, गणेश कुलांगे, ताराचंद भणगे, हरिभाऊ जऱ्हाड, गोरक्ष गवळी, पांडुरंग कावरे, भाग्येश शेंडगे, महेश केदार, ऋषिकेश देवा, आदिनाथ आगरकर, रफिक शेख, प्रा. भवाळ सर, श्रीकांत येवले, बाळासाहेब ठुबे, शुभम कावळे आदी उपस्थित होते.


अनिल शिंदे म्हणाले की, पावसाळ्यात या भागातील नागरिकांना रस्ते नसल्याने मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता. गणेशोत्सवात येथील काही कार्यक्रमांना पावसाळ्यात पाणी साचल्याने येता देखील आले नाही. नागरिकांच्या अडचणींची जाणीव ठेऊन या भागातील रस्त्यांचा प्रश्‍न तातडीने मार्गी लावण्यात आला आहे. नगरसेवक म्हणून नागरिकांकडे मताचा जोगवा मागायला जात असताना, नागरिकांनी दािखवलेला विश्‍वास सार्थ ठरविण्यासाठी या भागात भरभरून विकास कामे करण्यात येत आहे. या प्रभागात 3 कोटीच्या विकास कामांना जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिली असून, हे प्रस्ताव नाशिक आयुक्तांकडे मंजुरीला गेलेले आहे. लवकर त्याची टेंडर प्रोसेस होऊन ही विकास कामे मार्गी लावण्यात येणार असून, प्रस्तावित रस्ते देखील होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


खासेराव शितोळे म्हणाले की, या भागातील रस्त्यांची मोठी दुरावस्था होती. नगरसेवक शिंदे योग्य नियोजन करुन प्रभागातील प्रश्‍न सोडविण्याचे काम करत आहे. पूर्वी काम झाले नाही, मात्र सध्या वेगाने काम होत आहेत. सिमेंटचे रस्ते झाल्याचे आदर्श प्रभाग म्हणून हा परिसर सर्वांसमोर येणार आहे. नागरिकांनी देखील प्रभागाची स्वच्छता देखरेख ठेवावी. चांगले रस्ते होणे ही सर्वांची अपेक्षा असताना, झालेले चांगले रस्ते सांभाळणे ही देखील नागरिकांची जबाबदारी असल्याची त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात दत्ता गाडळकर यांनी दीपावलीची नागरिकांना एक चांगली भेट मिळाली आहे. प्रलंबित रस्त्यांचे प्रश्‍न देखील मार्गी लागणार असून, जिव्हाळ्याचा प्रश्‍न सोडविण्यात आल्याबद्दल त्यांनी नागरिकांच्या वतीने धन्यवाद मानले. प्रा. भगवान काटे म्हणाले की, 1998 पासून कॉलनी वसली गेली, मात्र अद्यापि कच्चे रस्ते होते. यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. प्रभाग 15 मध्ये भरीव निधी आणून विकास कामांनी नगरसेवक शिंदे यांनी कायापालट केला. पोट तिडकीने प्रभागातील प्रश्‍न सोडवण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.


यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजय कदम, प्राचार्यपदी पदोन्नती झालेले अर्जुन भुजबळ, जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सुनिता कोरडे, पीएसआय झालेले देवराम ढगे, पर्यवेक्षक म्हणून पदोन्नती मिळालेले बळीराम सातपुते, आदर्श शिक्षक गणेश डेरे, प्रविण शेरकर, विक्रीकर निरीक्षकपदी नियुक्ती झालेले भाग्येश शेंडगे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पारुनाथ ढोकळे यांनी केले. आभार विजय कांडेकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *