• Wed. Oct 15th, 2025

विडी कामगारांचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने

ByMirror

Jul 19, 2024

विडीला भाववाढ देऊन पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- विडी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी लालबावटा व इंटक विडी कामगार युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात शहरातील विडी कामगार महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. विडी कामगारांच्या प्रश्‍नावर यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.


या आंदोलनात जनरल सेक्रेटरी कॉ. ॲड. सुधीर टोकेकर, संघटनेच्या उपाध्यक्षा कॉ. भारती न्यालपेल्ली, भाकपचे राज्य सेक्रेटरी कॉ. ॲड. सुभाष लांडे, जिल्हा सचिव कॉ. ॲड. बन्सी सातपुते, भैरवनाथ वाकळे, संध्या मेढे, फिरोज शेख, सुलाबाई आदमाने, कॉ. संजय नांगरे, एस.एल. ठुबे, सुमित्रा जिंदम, शोभा बिमन, लक्ष्मी कोटा, संगिता कोंडा, सगुना श्रीमल, भाग्यलक्ष्मी गड्डम, कविता मच्चा, विनायक मच्चा, वनिता दिकोंडा, अरुणा मंचे, शमीम शेख, पुष्पा बिमन, सुनिता बिटला, रेणुका बिरु, उर्मिला दिकोंडा, पूजा न्यालपेल्ली, उमा बोल्ली आदींसह विडी कामगार महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.


महागाईच्या काळात विडी कामगारांना जीवन जगणे अवघड झाले आहे. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च, आरोग्याचे प्रश्‍न गंभीर असताना शासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. विडी कामगारांना दर हजार विडीला 211.50 वेतन रुपये मिळते. या वेतनात त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अवघड बनले आहे. तर विडी कामगार पेन्शनरला फक्त सातशे ते हजार रुपये मिळत असून, त्यामध्ये औषधांचा खर्चही भागत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


विडी कामगारांना दर हजार विडीला अडीचशे ते तीनशे रुपये मिळावे, विडी कामगार पेन्शनरला कमीत कमी तीन हजार रुपये पेन्शन द्यावी, केशरी रेशन कार्डधारकांना रेशनावर धान्य मिळावे, विडी कामगारांना अल्प दरात घरकुल योजनांचा लाभ मिळावा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्वच बहिणींना मिळण्यासाठी त्यातील सर्व अटी रद्द करण्याची मागणी विडी कामगारांच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना देण्यात आले. या मागण्यांची सोडवणुक न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कॉ. ॲड. सुधीर टोकेकर यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *