जिव्हाळ्याचे प्रश्न सोडून शहर नामांतराने भावनिक मुद्दयांवर सत्ताधारी राजकारण करत असल्याचा आरोप
जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीने घेतल्या मुलाखती
अहमदनगर (प्रतिनिधी)- वंचित बहुजन आघाडी राज्यातील आदिवासी, अनुसूचित जाती, भटके-विमुक्त व अल्पसंख्यांक समाजाचे नेतृत्व करत आहे. या समाजाच्या मतांवर सत्ता उपभोगून त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात असताना, त्या समाजातून नेतृत्व देण्याचे काम पक्षाच्या माध्यमातून केले जाणार आहे. यासाठी राज्यभर मुलाखतीद्वारे चाचपणी सुरु असल्याची माहिती प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी दिली. तर शहराच्या नामांतरावर बोलताना सर्वसामान्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न सोडून भावनिक मुद्दयांवर सत्ताधारी राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. शहरातील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पक्षाची बैठक व मुलाखतीप्रसंगी ठाकूर बोलत होत्या. याप्रसंगी राज्य महासचिव प्रा. किसन चव्हाण, राज्य प्रवक्ते ॲड. अरुण जाधव, उत्कर्षा रूपवते, दक्षिण-उत्तर प्रभारी डॉ. सुरेश शेळके, उत्तर जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे, जिल्हा महासचिव अनिल जाधव, शहराध्यक्ष हनीफ शेख, जिल्हा संपर्कप्रमुख योगेश साठे,अनिल पाडळ,राहुरी तालुकाध्यक्ष संतोष चोळके, नगर तालुकाध्यक्ष मारुती पाटोळे, प्रसाद भिवसने, किरण पाटोळे, देविदास भालेराव, सोमनाथ भैलूमे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे ठाकूर म्हणाल्या की, ज्यांच्या मतांवर सत्ता मिळवली, त्याच समाजाला सत्तेपासून वंचित ठेवण्याचे काम प्रस्थापित सत्ताधारी व विरोधकांनी केले आहे. प्रत्येक समूहाला लोकसंख्येच्या प्रमाणात उमेदवारी देण्याचे काम वंचित बहुजन आघाडी करणार आहे. प्रस्थापितांना पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर आरक्षण, शेतकरी प्रश्न व शेतीमालाला हमीभावासाठी कायदा हे प्रमुख मुद्दे घेऊन वंचित बहुजन आघाडी राज्याच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्य महासचिव प्रा. किसन चव्हाण म्हणाले की, प्रस्थापितांनी व विरोधकांनी आलटून पालटून सत्ता उपभोगली. वंचित घटकातील समाजबांधवांचा त्यांनी कधीही विचार केलेला नाही. वंचित बहुजन आघाडी विस्थापीतांचा पक्ष म्हणून पुढे आला आहे. राजकीय घराण्यांची सत्ता उलथवून लावण्यासाठी व दुर्लक्षित समूहाला प्रतिनिधित्व देण्याचे काम पक्षाच्या माध्यमातून केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वंचित बहुजन आघाडीच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघात निवडणुक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवारासह कार्यकर्ते उपस्थित होते. तर शेवगाव-पाथर्डी विधानसभेसाठी प्रा. किसन चव्हाण यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.
