पाणी निचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आयुक्तांना निवेदन
वाहणारा ओढा अतिक्रमणामुळे बुजवण्यात आल्याने प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप
नगर (प्रतिनिधी)- शहरातील पाईपलाईन रोड, श्रीकृष्ण नगर परिसरातील वैष्णवी कॉलनीत पावसामुळे तुंबलेल्या पाण्याने जलमय होत आहे. या गाळयुक्त व मैलामिश्रित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, तातडीने पाण्याचा निचरा व्यवस्था सुधारण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या प्रसंगी माजी नगरसेवक निखील वारे, विजयकुमार कुलकर्णी, प्रकाश कुलकर्णी, रमेश कुलकर्णी, विशाल साबळे, श्रीमती भंडळकर, दत्तात्रय कुलकर्णी, जीवन क्षीरसागर, कौशल्या लोखंडे आदी नागरिक उपस्थित होते.
वैष्णवी कॉलनीतील नागरिकांना प्रत्येक पावसात घरात साचलेल्या पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या पाण्यासोबत गाळ, मैला आणि दुर्गंधीयुक्त पाणी घरात शिरत असून, लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत साऱ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पूर्वी कॉलनीजवळून वाहणारा ओढा अतिक्रमणामुळे बुजवण्यात आला, त्यामुळे नैसर्गिक निचऱ्याचा मार्ग बंद झाला आहे. त्याऐवजी लहान पाईपमधून पाण्याचा निचरा करण्यात येत असून, मुसळधार पावसात या पाइपांची क्षमताच अपुरी पडते. परिणामी पाण्याचा संपूर्ण प्रवाह थेट कॉलनीत शिरतो व परिसर जलमय होतो.
स्थानिकांनी अनेकवेळा मनपा प्रशासनाकडे तक्रारी केल्या, मात्र आजवर कुठलीही ठोस कार्यवाही न झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अखेर त्यांनी थेट आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे निवेदन दिले. आयुक्त डांगे यांनी याची गंभीर दखल घेत वैष्णवी कॉलनीची पाहणी करून तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन नागरिकांना दिले.