• Tue. Jul 22nd, 2025

शहरात धोकादायक पद्धतीने रस्त्यावर व नागरी वसाहतीमध्ये अनाधिकृत फटाके विक्री

ByMirror

Nov 7, 2023

अनाधिकृत फटाके स्टॉलवर कारवाई करण्याची फुले ब्रिगेडची मागणी

स्टॉल धारकांकडे कुठल्याही प्रकारचा परवाना किंवा आग विजवण्यासाठीचे साधन नसल्याचा आरोप

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात धोकादायक पद्धतीने रस्त्यावर व नागरी वसाहतीमध्ये सुरु असलेल्या अनाधिकृत फटाके स्टॉलवर कारवाई करण्याची मागणी फुले ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. फुले ब्रिगेडच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांची भेट घेऊन या मागणीचे निवेदन दिले.


शहरात सुरु असलेले अनाधिकृत फटाके स्टॉल मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण ठरत असल्याप्रकरणी संघटनेच्या वतीने लक्ष वेधण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष दीपक खेडकर, योगेश रोकडे, जयंत घोरपडे, दत्तात्रय वाबळे, हरिभाऊ सांगळे, अशोकराव तांदळे, भीमराव रोकडे, योगेश भुजबळ, अक्षय भगत, अमोल जाधव, संकल्प राऊत, बाळासाहेब महामुनी, निलेशराव खळदकर, गोपाल बोरूडे, प्रसाद दंरदले आदी उपस्थित होते.


अहमदनगर शहरात व उपनगरात मोठ्या प्रमाणात विनापरवाना स्टॉलवर फटाका विक्री सुरू आहे. रस्त्यावर व नागरी वसाहतीमध्ये विनापरवाना फटाके विक्रीमुळे काही दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या स्टॉल धारकांकडे कुठल्याही प्रकारचा परवाना किंवा आग विजवण्यासाठीचे कुठलेही साधन उपलब्ध नाही. इतर शहरांप्रमाणे आपल्या शहरात देखील काही दुर्घटना घडू नये, यासाठी प्रशासनाने कारवाई करण्याचे निवेदनात म्हंटले आहे.


तातडीने प्रशासनाने अनाधिकृत फटाका विक्रेत्यांवर कारवाई करावी, अन्यथा फुले ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


शहर व उपनगरात मोठ्या प्रमाणात अनाधिकृत फटाके स्टॉल नागरी वसाहतीमध्ये लावण्यात आले आहे. कोणताही विचार न करता नागरिकांचा जीव धोक्यात घालून हा व्यवसाय सुरु आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन काही दुर्घटना होण्यापूर्वीच त्यांच्यावर कारवाई करावी. -दीपक खेडकर (शहराध्यक्ष, फुले ब्रिगेड)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *