• Sat. Feb 28th, 2026

स्त्री शिक्षणाचा पाया रचला गेलेल्या क्लेरा ब्रूस हायस्कूल येथे सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन

ByMirror

Jan 6, 2026

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणक्रांतीचा ऐतिहासिक साक्षीदार क्लेरा ब्रूस हायस्कूल -अशोक शिंदे


नीलिमा बंडेलू यांना “वारसा सावित्रीचा” हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 195 व्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर येथील क्लेरा ब्रूस हायस्कूल या ऐतिहासिक वास्तूला प्रत्यक्ष भेट देत त्यांच्या शिक्षणकार्याला खरे अभिवादन करण्यात आले. शाहू-फुले-आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचार मंचच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.


सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणक्रांतीचा पाया ज्या ठिकाणी रचला गेला, तीच ही वास्तू असल्याने या भेटीला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त आहे. यावेळी अशोक शिंदे, उषाताई शिंदे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव तथा न्यायाधीश योगेश पैठणकर, शाहू फुले आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचार मंचाचे राज्य अध्यक्ष गणेश ढोबळे, शहराध्यक्ष युनूस पठाण, महाराष्ट्र सरचिटणीस सुनील सकट, मानवी हक्क अभियानचे शहर अध्यक्ष अशोक भोसले, ॲड. सुभाष भोर, ॲड. संतोष गायकवाड, ॲड. बेबी बोराटे, सामाजिक कार्यकर्त्या संध्या मेढे आदींसह शिक्षक वृंद व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.


आजच्या क्लेरा ब्रूस हायस्कूलची इमारत त्या काळी ख्रिश्‍चन मिशनरीच्या अंतर्गत कार्यरत होती. त्या काळात या शाळेच्या प्राध्यापिका मा. सिंथिया फरार या शाळेचे व्यवस्थापन पाहत होत्या. याच ठिकाणी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व त्यांच्या सहकारी फातिमा शेख यांनी अध्यापनाचे प्राथमिक शिक्षण घेतले होते. त्यांनी येथेच ‘टू इयर टीचर्स डिप्लोमा’ हा अभ्यासक्रम पूर्ण केला. याच शिक्षणाच्या बळावर सावित्रीबाई फुले यांनी 1861 साली पुण्यातील भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू करून भारतीय समाजाच्या इतिहासात शिक्षणक्रांतीचा नवा अध्याय लिहिला. या ऐतिहासिक वास्तूला भेट दिल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या.


“या जागेला प्रत्यक्ष भेट दिल्यावर एक नवी ऊर्जा, नवी उमेद आणि नवी ताकद मिळाल्याची अनुभूती येते,” असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. विशेष म्हणजे, ही वास्तू आजही मूळ स्वरूपात जतन करण्यात आली असून ती नव्या पिढीसाठी एक अमूल्य ठेवा आहे. इतिहासात डोकावल्यास, सावित्रीबाई व फातिमा शेख यांच्या अध्यापन प्रशिक्षणाची माहिती महात्मा ज्योतिबा फुले यांना त्यांचे चळवळीतील सहकारी मित्र सदाशिवराव गोवंडे यांनी दिली होती. “येथे एकदा शाळा पाहून घ्या आणि नंतर दाखला घ्या,” असा सल्ला त्यांनी दिल्यानंतर महात्मा फुले स्वतः येथे आले आणि सावित्रीबाई व फातिमा शेख यांचे प्रवेश निश्‍चित झाले, अशी ऐतिहासिक नोंद आहे. सावित्रीबाई फुले व फातिमा शेख यांच्या शिक्षणप्रवासाचा साक्षीदार असलेली ही वास्तू अहिल्यानगरसाठी अभिमानाची बाब आहे. हा ऐतिहासिक ठेवा जतन करून पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणे ही समाजाची जबाबदारी असून, सावित्रीबार्इंच्या विचारांचा वारसा जिवंत ठेवण्याचे हेच खरे अभिवादन ठरेल, असे मत अशोक शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.


या दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ समाजसेविका, माजी प्रशासकीय अधिकारी नीलिमा जाधव-बंडेलू यांना “वारसा सावित्रीचा” हा पुरस्कार 2026 मिळाला मिळाल्याबद्दल विचारमंचाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांना शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *