हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने दहशतवादी कारवाईचा निषेध; गुन्हेगारांना फाशीची मागणी
दहशतवादाचे मूळ कायमचे संपवण्यासाठी कठोर पावले उचलावी -संजय सपकाळ
अहिल्यानगर (प्रतिनिधी)-दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण कार स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली.
श्रद्धांजली सभेत उपस्थित सर्व नागरिकांनी दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला तसेच देशाच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्या या घटनेत सामील गुन्हेगारांना तातडीने अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी सरकारकडे करण्यात आली. या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, सचिन चोपडा, रमेशराव वराडे, मेजर दिलीप ठोकळ, दीपक धाडगे, सर्वेश सपकाळ, जहीर सय्यद, मनोहर दरवडे, ज्ञानेश्वर महाराज अनावडे, अभिजीत सपकाळ, रतन मेहेत्रे, सुधीर कपाळे, विलासराव आहेर, दीपकराव घोडके, दिलीप गुगळे, अविनाश जाधव, दशरथ मुंडे, अशोक पराते, सरदारसिंग परदेशी, मुन्ना वाघस्कर, अविनाश पोतदार, जालिंदर अळकुटे, दीपक मेहतानी, सखाराम अळकुटे, सुधाकर चिदंबर, योगेश चौधरी, योगेश हळगावकर, रामनाथ गर्जे, शशिकांत घिगे, सूर्यकांत कटोरे, राजू कांबळे, विकास निमसे, अजय खंडागळे, दीपक बोंदर्डे आदी उपस्थित होते.
संजय सपकाळ म्हणाले की, लाल किल्ला म्हणजे आपल्या देशाच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे. अशा ऐतिहासिक स्थळी झालेला स्फोट केवळ नागरिकांवरचा नाही, तर संपूर्ण भारतावर झालेला हल्ला आहे. दहशतवादाचे मूळ कायमचे संपवण्यासाठी कठोर पावले उचलली गेली पाहिजेत. यामधील गुन्हेगारांना तात्काळ फाशी द्यावी, यामुळे दहशतवादी कारवाया करणाऱ्यांना वचक बसेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
सचिन चोपडा म्हणाले म्हणाले की, दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी फक्त पोलीस वा लष्कर नव्हे, तर प्रत्येक नागरिकाने सजग राहणे आवश्यक आहे. आज देश एकत्र येऊन अशा दहशतवादी प्रवृत्तींविरुद्ध उभा राहिला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. यावेळी श्रध्दांजली वाहून भारत माता की जय…., वंदे मातरम…च्या घोषणांनी परिसर दणाणला.
