सावित्रीबाईंनी शिक्षणाची ज्योत पेटवून महिलांचा उध्दार केला -सुदाम ठोकळ
नगर (प्रतिनिधी)- क्रांतीज्योती बहुउद्देशीय संस्था आणि भाजप ओबीसी मोर्चाच्या संयुक्त विद्यमाने कामरगाव (ता. नगर) येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिन साजरा करण्यात आला. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी कामरगावचे सरपंच संदीप ढवळे, उपसरपंच संदीप लष्करे, माजी मुख्याध्यापक सुदाम ठोकळ, सोपान शिंदे, ज्ञानदेव कार्ले, गोरख ठोकळ, भानुदास ठोकळ, लक्ष्मण ठोकळ, भाऊ साठे, आदित्य जाधव, क्रांतीज्योती संस्थेचे अध्यक्ष तथा भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश बनकर, संस्थेचे सचिव नितीन डागवाले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

सरपंच संदीप ढवळे म्हणाले की, सावित्रीबाईंनी बहुजन समाजातील मुलींना शिक्षणाची दारे खुली करुन दिल्याने समाजाची प्रगती झाली. त्यांचे विचार आजही सर्वांना प्रेरणादायी असून, आज देखील शिक्षणाने सामाजिक, वैचारिक व आर्थिक विषमता दूर होणार आहे. शिक्षणाने आदर्श नागरिक घडत असून, सावित्रीबाईंनी शिक्षणाची दारे उघडी करुन दिल्याने महिलांचा सन्मान वाढला असल्याचे त्यांनी सांगितले.
सुदाम ठोकळ म्हणाले की, सावित्रीबाईंनी शिक्षणाची ज्योत पेटवून महिलांचा उध्दार केला. प्रवाहा विरोधात जाऊन त्यांनी समाजाच्या उत्कर्षासाठी कार्य केले. आजच्या कर्तृत्ववान स्त्रीचे श्रेय सावित्रीबाई यांना जाते. त्यांचे स्मरण करताना त्यांच्या विचारांचा अंगीकार करणे महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसरपंच संदीप लष्करे यांनी केले. आभार गणेश बनकर यांनी मानले.