एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न न सुटल्यास प्रत्येक विभागात आंदोलन करण्याची तयारी
एसटी महामंडळाचा डोलारा चालक-वाहकांमुळे उभा -बलभीम कुबडे
अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य परिवहन सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या (महाराष्ट्र) वतीने 25 वर्षे विना अपघात सेवा देणाऱ्या जिल्ह्यातील दोन चालकांचा गौरव पुणे येथे झाले. 25 हजार रुपये, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन चालकांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
पुणे येथे राज्य परिवहन निवृत कर्मचारी संघटनेची महाराष्ट्र पातळीवरील केंद्रीय सदस्याची मिटीग झाली. यामध्ये विना अपघात सेवा देणाऱ्या चालकांचा सन्मान करुन एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. श्रीगोंदा आगारातील सेवानिवृत्त चालक विठ्ठलराव जगताप तर जामखेड आगारातील पठाडे यांनी 25 वर्षे विना अपघात सेवा दिली दिल्याबद्दल त्यांचा सन्मान सोहळा यावेळी पार पडला. या कार्यक्रमासाठी नगर विभागातर्फे केंद्रीय सदस्य बलभीम कुबडे यांच्यासह राज्याचे पदाधिकारी व केंद्रीय कमिटी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संघटनेकडून महामंडळाशी सेवानिवृत्त कामगारांच्या समस्यांवर व प्रलंबित प्रश्नावर सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे. पुढील कारवाईसाठी मुख्यमंत्री व परिवहनमंत्री एकनाथ शिंदे यांचेशी चर्चा होणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. तर चर्चेतून मार्ग न निघाल्यास संघटनेच्या प्रत्येक विभागात जिल्हाधिकारी कार्यालया पुढे आंदोलन करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली.
एसटी महामंडळाचा डोलारा चालक-वाहकांमुळे उभा आहे. त्यांचे प्रश्न सुटणे आवश्यक आहे. या बैठकीत अहमदनगर विभागातील प्रश्नावर देखील चर्चा करण्यात आली. विशेषतः पेन्शनबाबत विलंब व आर्थिक प्रश्न मांडण्यात आले. वेळेत प्रश्नावर तोडगा न निघाल्यास विभाग कार्यालय अहमदनगर येथे उपोषण करण्याची तयारी संघटनेच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती बलभीम कुबडे यांनी दिली.