जय हिंद फाउंडेशनचा उपक्रम; फेरीतील 100 वडाची झाडे भगवानगडावर लागवडीसाठी रवाना
देश संरक्षणाच्या कर्तव्यानंतर पर्यावरणाच्या संरक्षणासाठी माजी सैनिकांचा पुढाकार कौतुकास्पद -डॉ. पंकज आशिया
नगर (प्रतिनिधी)- वृक्षारोपण व संवर्धनाचा संदेश देत शहरातून जय हिंद फाउंडेशनच्या वतीने वृक्ष फेरी काढण्यात आली. या वृक्ष फेरीमध्ये दहा गाड्यांमध्ये 100 वडाची झाडे, गाडीला राष्ट्रीय तिरंगा ध्वज लाऊन फेरी काढण्यात आली. तर फेरी मधील वडाची झाडे भगवानगड या ठिकाणी लागवडीसाठी रवाना करण्यात आली.
वृक्ष फेरीचे प्रारंभ जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या हस्ते झाला. यावेळी निवासी जिल्हाधिकारी दादासाहेब गिते, वन विभागचे सहाय्यक वनसंरक्षक जी.पी. मिसाळ, सौ.ए.आर. दिघे, वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण साबळे, अनिल शेलार, लेखापालन ए.आर. शिरसाट, सुधिर लाड, फाऊंडेशनचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, संभाजी शिरसाठ, सचिन दहिफळे, निळकंठ उल्हारे, अर्जुन आव्हाड, पोलीस कॉन्स्टेबल इरफान शेख, सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ औटी, पप्पू ढाकणे, म्हातारदेव नेहरकर, किरण ढवळे, वैभव जावळे, संदिप पालवे, अतुल नेटके, भास्कर पालवे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले की, पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीसाठी जय हिंद फाउंडेशनने घेतलेला पुढाकार दिशादर्शक आहे. देश संरक्षणाच्या कर्तव्यानंतर पर्यावरणाच्या संरक्षणासाठी माजी सैनिकांचा पुढाकार कौतुकास्पद आहे. वृक्षारोपणाचे मोठे उद्दिष्ट समोर ठेऊन कार्य सुरु असून, या कार्यात जय हिंदचा देखील हातभार लागणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
शिवाजी पालवे यांनी जय हिंदच्या माध्यमातून जिल्हाभर वृक्षारोपणाची मोहिम सुरु असून, फक्त झाडे लावून न थांबता ती जगविण्याचे काम देखील वर्षभर केले जात आहे. अनेक गाव व ओसाड डोंगररांगा, देवस्थान परिसरात वृक्षारोपण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. वृक्षारोपणासाठी वन विभागाच्या वतीने लागणारी झाडे व मदत अहिल्यानगर वन विभागाच्या माध्यमातून केली जाणार असल्याचे वन विभागाचे अधिकारी गणेश मिसाळ यांनी स्पष्ट केले. 100 वडाची झाडांची फेरी अहिल्यानगर वरून करंजी-पाथर्डी मार्गे भगवानगड या ठिकाणी लागवडीसाठी रवाना करण्यात आली.