आंबा, जांभूळ, वड, पिंपळ यांसारख्या देशी झाडांची लागवड
प्रत्येक कुटुंबाने किमान दोन झाडे लावून त्यांचे संवर्धन करावे -योगेश चव्हाण (कार्यकारी अभियंता)
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत विद्युत निरीक्षक कार्यालय, अहिल्यानगर आणि स्पार्क इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या दिल्ली गेट येथील सब स्टेशन परिसरात या उपक्रमांतर्गत आंबा, जांभूळ, वड, नारळ, पिंपळ यांसारख्या पर्यावरणपूरक देशी झाडांची लागवड करण्यात आली.
या अभियानाप्रसंगी विद्युत निरीक्षक श्रीमती रा. सं. गीते, अभियंते योगेश सातपुते, समीर सहाणे, अमर स्वामी, श्रीमती शेख, चव्हाण तसेच स्पार्क इंडस्ट्रीजचे श्रीनिवास पाटील उपस्थित होते.
कार्यकारी अभियंता योगेश चव्हाण यांनी सांगितले की, हवामान बदलामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यावर उपाय म्हणून वृक्षारोपण अत्यावश्यक आहे. प्रत्येक कुटुंबाने किमान दोन झाडे लावून त्यांचे संवर्धन करणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले.
त्याचप्रमाणे अभियंता योगेश सातपुते यांनी महावितरण कंपनीने या उपक्रमासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच स्पार्क इंडस्ट्रीज यांनी झाडांचे संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या उपक्रमाला अति. कार्यकारी अभियंता कुमावत यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.