• Tue. Jul 1st, 2025

जिल्हा न्यायालयात न्यायाधीशांच्या हस्ते वृक्षारोपण

ByMirror

Jun 24, 2025

न्यायाचे रक्षणाबरोबर निसर्गाचे रक्षण, ही देखील सामाजिक जबाबदारी -अंजू शेंडे (जिल्हा सत्र न्यायाधीश)


गार्डन कमिटी न्यायालयीन परिसर हिरवाईने फुलवणार

नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर येथील जिल्हा न्यायालयाच्या आवारात पर्यावरण रक्षणाचा संदेश देत प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांच्या हस्ते वृक्षांची लागवड करण्यात आली. जिल्हा न्यायालयाच्या गार्डन कमिटीच्या वतीने वृक्षारोपण अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला न्यायालयीन अधिकारी, विधिज्ञ आणि कर्मचारी वर्गाचा उत्तम प्रतिसाद लाभला.


कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव कृष्णा सोनवणे, जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, ॲड. राजेश कावरे, ॲड. समीर पटेल, ॲड. भूषण बऱ्हाटे, ॲड. जय भोसले, ॲड. शिवाजी सांगळे, ॲड. संजय पाटील, ॲड. सुहास टोणे, ॲड. नरेश गुगळे, जिल्हा न्यायालयीन व्यवस्थापक कृपावरम, वरिष्ठ लिपीक अमोल वाकचौरे, सुनिल विरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


अंजू शेंडे म्हणाल्या की, आपण न्यायाचे रक्षण करतोच, पण यासोबतच निसर्गाचे रक्षण करणे ही देखील आपल्या सामाजिक जबाबदारीचा एक भाग आहे. आजच्या घडीला वाढते तापमान, कमी होणारी पर्जन्यमान आणि पर्यावरणीय असंतुलन ही गंभीर आव्हाने आहेत. त्यामुळे अशा उपक्रमांद्वारे हिरवाईने परिसर नटवून पर्यावरण संवर्धन काळाची गरज बनली असल्याचे त्यांनी सांगितले.


लावलेल्या वृक्षाच्या देखभालीची जबाबदारी गार्डन कमिटीच्या वतीने स्विकारण्यात आलेली आहे. न्यायालयीन परिसर अधिक हरित करण्याच्या दृष्टीने नियोजनबद्ध मोहिम सुरु असल्याचे यावेळी कमिटीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *