महंतांच्या उपस्थितीमध्ये वडासह फळझाडांची लागवड
निसर्गाचे रक्षण करणे हे मनुष्याचे कर्तव्य -भास्करगिरी महाराज
अहमदनगर (प्रतिनिधी)- वाढते प्रदुषण रोखण्यासाठी व पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने माजी सैनिकांच्या जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने सुरु असलेल्या वृक्षरोपण व संवर्धन अभियानातंर्गत माळी बाभुळगाव (ता. पाथर्डी) येथे वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. तीर्थक्षेत्र देवगड संस्थानाचे मठाधिपती ह.भ.प. भास्करगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ह.भ.प. अनिल वाळके महाराज यांच्या हस्ते या अभियानाचा वृक्षरोपण करुन प्रारंभ करण्यात आला.
संत ज्ञानेश्वर महाराज सेवा धाम येथे झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी यावेळी ह.भ.प. महंत रामगिरी महाराज, ह.भ.प. दिनकर महाराज अंचवले, महंत ह.भ.प.जनार्दन महाराज शिदे, माजी मंत्री महादेव जानकर, आमदार मोनिकाताई राजळे, ह.भ.प. शिवशाहीर कल्याण काळे, राष्ट्रीय भारुडकार हमिद सय्यद, ज्ञानेश्वर बटुळे महाराज, पंचायत समितीचे सदस्य सुनील ओहळ, जय हिंदचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, रोहिदास पालवे, सचिन पालवे आदि उपस्थित होते.
भास्करगिरी महाराज म्हणाले की, निसर्गातच खरा परमेश्वर वसलेला आहे. सर्वच धर्म ग्रंथामध्ये निसर्गाला महत्त्व देण्यात आले असून, सजीव सृष्टीचे अस्तित्व निसर्गाशी जोडलेले आहे. निसर्गाचे रक्षण करणे हे मनुष्याचे कर्तव्य आहे. वृक्षरोपण व संवर्धन काळाची गरज बनली असून, देश रक्षणाच्या कर्तव्यानंतर माजी सैनिकांनी पर्यावरण रक्षणासाठी दिलेले योगदान प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. तर पर्यावरण संवर्धनाची चळवळ पुढे चालविण्याचे त्यांनी आवाहन केले.
अनिल वाळके महाराज यांनी जय हिंदच्या माध्यमातून जिल्ह्यात वृक्षरोपण चळवळीला गती मिळाली असून, माजी सैनिकांच्या पुढाकाराने जिल्हा हरित व सुंदर होणार असल्याची भावना व्यक्त केली. संत ज्ञानेश्वर महाराज सेवा धाम परिसरात 21 वटवृक्ष व चिंच, आवळा, जांभूळ, भोकर, आंबा आदी 70 फळझाडांची लागवड करण्यात आली. शिवाजी पालवे यांनी आभार मानून जिल्ह्यातील उजाड डोंगरांगा व माळरान हिरवाईने फुलविण्याचा जय हिंदचा संकल्प असून, त्या दृष्टीने काही वर्षांपासून सातत्याने वृक्षरोपण व संवर्धनाचे कार्य सुरु असल्याची माहिती दिली.