सह्याद्री छावा संघटनेची मागणी; 30 सप्टेंबरला उपोषण
जिल्हा परिषदेत अनेक चूकीच्या कामांना पाठिशी घालत असल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेत अनेक चूकीच्या कामांना जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी पाठिशी घालत असल्याचा आरोप करुन त्यांच्या बदलीची मागणी सह्याद्री छावा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत ग्रामविकास सचिव व नाशिक विभागीय आयुक्तांना पाठविण्यात आले असून, या मागणीसाठी संघटनेच्या वतीने 30 सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणाचा इशार देण्यात आला आहे. यावेळी छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे पाटील, धडक जनरल कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीधर शेलार, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता वामन, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद साळवे, महिला जिल्हाध्यक्षा तनीज शेख, संदीप शिंदे, रमेश पंडित, शिवाजी भोसले, भाऊसाहेब शिंदे, राजू महाराज पाटोळे, सहादू दोंदे आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निकृष्ट व दर्जाहीन बोगस कामे करून पैसा लाटणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई न करता त्यांना पाठिशी घालत आहे. टेंडर निवेदनुसार अटी व शर्तीचे पालन मर्जीतले ठेकेदार करत नाही. जलसंधारण विभागातील सर्व कामे नियमबाह्य व चुकीची झालेली असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
या चूकीच्या कामांविरोधात तक्रार करुनही कुठलीही दखल न घेता ठेकेदाराचे बिल अदा करण्यात आलेले आहे. आलेल्या तक्रारीवर त्यांना कोणताही ठेकेदार दोषी दिसून आलेला नाही. जिल्हा परिषद विभागाने कलर कामचे देखील निकृष्ट कामाचे मटेरियल वापरून निकृष्टपणे काम करण्यात आलेले आहे. सदर रंगकामाची चौकशी होणे आवश्यक आहे.
इमारत बांधकाम कामगारांना प्रमाणपत्र न देण्याबाबत पाथर्डी व राहुरी बिडीओ यांनी लेखी नोटीस काढून शासनाच्या जीआरचा उल्लंघन करून कायद्याचा मनमानी पद्धतीने अर्थ काढला. कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन कामे केली. महाराष्ट्र नागरी सेवा हमी अधिनियमन (सेवा व शिस्त अपील) यांचे उल्लंघन करुन खोटी व बनावट माहिती इतरांना देऊन कामगारांचे नुकसान केले. पदाचा गैरवापर करणाऱ्या या अधिकाऱ्यांविरोधात लेखी तक्रार करूनही अद्याप पर्यंत त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. शिक्षक मुख्यालयात न राहता भत्ता घेतात. याबाबत इतर सामाजिक कार्यकर्ते व संघटनांच्या वतीने तक्रारी होऊनही कुठलीही कारवाई झालेली नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
दोन वेळेस बदली झालेली असताना देखील त्यांना कोणाच्या आशीर्वादाने पुन्हा त्याच ठिकाणी बसविण्यात आले. ग्रामपंचायत विभागातील कर्मचारी, अधिकारी हे मनमानी पद्धतीने कारभार करत आहे. अनेक विभागांचा अधिकार एका अभियंताकडे सोपविण्यात आलेला आहे. अनेक विभागाचे कारभार त्याच्याकडे देण्यामागे काय गौडबंगाल आहे? याची देखील चौकशी होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
