हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी, धावणे स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मतदार जागृती अभियानातून सक्षम लोकशाही घडविण्याचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- नेहरू युवा केंद्र, श्री नवनाथ युवा मंडळ व स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने निमगाव वाघा (ता. नगर) येथील श्री नवनाथ विद्यालयात नगर तालुका व पारनेर तालुकास्तरीय विविध क्रीडा स्पर्धा पार पडल्या. हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी, धावणे (रिले) या मैदानी स्पर्धेचा थरार रंगला होता. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या खेळातील कौशल्याचे प्रदर्शन घडविले. तर यावेळी मतदार जागृती अभियान राबविण्यात आले.
क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा शिक्षक चंद्रकांत पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदीप डोंगरे, प्रतिभा डोंगरे, गणेश वाळुंजकर आदींसह शालेय शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पै. नाना डोंगरे म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये दिवसेंदिवस मैदानी खेळाचे महत्त्व कमी होत चालले आहे. विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणाबरोबरच खेळाकडे वळावे. क्रीडा स्पर्धेतून करिअर करण्याच्या विविध संधी उपलब्ध आहेत. शासकीय नोकरीसाठी खेळाडूंना जागा राखीव आहेत. बाल वयातच खेळाची गोडी निर्माण झाल्यास त्याचे आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चंद्रकांत पवार म्हणाले, जीवनात खेळ आनंद निर्माण करतो. तर जीवनात विजय मिळवून संयमाने व पराभव झाल्यास खचून न जाता पुढे जाण्याचे गुण विकसीत करतात. प्रत्येक विद्यार्थ्यांने एकतरी मैदानी खेळ खेळण्याचे त्यांनी आवाहन केले.
मतदार जागृती अभियानाच्या माध्यमातून सक्षम लोकशाही घडविण्याचे आवाहन करण्यात आले. मतदार यादीत नांव समाविष्ट करणे व मतदान करण्याबातची मार्गदर्शक पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. तर नाव मतदार यादीत नोंदवणे, नाव दुरुस्ती आदी संदर्भात युवकांना मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमास नेहरु युवा केंद्राचे उपनिदेशक शिवाजी खरात, रमेश गाडगे यांचे मार्गदर्शन लाभले.