धर्मनिरपेक्ष भारताच्या विवेकाला जागवणारी चळवळ असल्याचे स्पष्ट
सत्याग्रहातून करुणा, सत्य आणि अहिंसेचा संदेश
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारत सरकारने 1 ऑक्टोबर 2025 रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आर.एस.एस.) शताब्दी वर्षानिमित्त 100 रुपये चे विशेष स्मृती नाणे जारी केले. या नाण्यावर गणवेशातील स्वयंसेवकाचे चित्र आणि संघाचे ब्रीदवाक्य राष्ट्राय स्वाहा, इदम् राष्ट्राय इदम् न मम! कोरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे नाणे राष्ट्राला समर्पित करताना एकता आणि ऐक्याचा संदेश दिला असला, तरी देशभरात या नाण्यामुळे भारताच्या धर्मनिरपेक्ष आणि सर्वसमावेशक मूल्यांबाबत चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने हे राम कॉइन सत्याग्रह जारी करण्यात आले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना सन 1925 साली डॉ. केशवराव बळीराम हेडगेवार यांनी केली. संघटनाची भूमिका समाजनिर्मितीची असली तरी, स्वातंत्र्यलढ्यातील भारत छोडो आंदोलन, असहकार चळवळ यांसारख्या प्रमुख ऐतिहासिक चळवळींमध्ये संघाचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता, असे नोंदी दर्शवतात. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर संघाचे नाव चर्चेत आले आणि राष्ट्रवादी विचारसरणीत खोल मतभेद उघड झाले. या पार्श्वभूमीवर नाण्यावर आर.एस.एस. चे चिन्ह आणि ब्रीदवाक्य असणे हे अनेकांसाठी चिंतनाचा विषय ठरले असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
या संदर्भात पीपल्स हेल्पलाईनने नागरिक, विचारवंत आणि सामाजिक संस्था यांना बरोबर घेऊन हे राम नाणे सत्याग्रह 2025 या नावाने गांधीवादी मूल्यांवर आधारित शांत, विवेकपूर्ण चळवळ सुरू केली आहे. या सत्याग्रहाचा मुख्य संदेश असा आहे की, भारतीय चलन हे प्रत्येक नागरिकाचे आहे; ते कोणत्याही एका विचारधारेचे असू नये. या चळवळीतून गांधीजींच्या अखेरच्या हे राम… या शब्दातील करुणा, सत्य आणि क्षमेचा संदेश पुन्हा जागवण्याचा प्रयत्न होत आहे. आंदोलनकर्त्यांचा विश्वास आहे की, राष्ट्राची खरी ओळख धातूमध्ये नव्हे, तर नागरिकांच्या विवेक, करुणा आणि अहिंसेच्या भावनेत असल्याचे म्हंटले आहे.
हे राम नाणे सत्याग्रहफफ हे केवळ विरोधाचे नव्हे, तर रचनात्मक परिवर्तनाचे आंदोलन आहे. या चळवळीची चार प्रमुख तत्त्वे आहे. अहिंसा: प्रत्येक कृती, शब्द आणि विचार शांततेने व सौहार्दाने व्यक्त करणे, सत्य: प्रत्येक चर्चा इतिहास आणि वस्तुस्थितीवर आधारलेली असणे, संवाद: विरोधकांशी तिरस्काराऐवजी परस्पर आदराने संवाद साधणे, रचनात्मक कार्य: वृक्षारोपण, स्वच्छता, पाणी संवर्धन व शिक्षणासाठी प्रयत्न करणे, याचा समावेश आहे. या चळवळीत सहभागी नागरिकांनी 2025 हे वर्ष हे राम नाणे सत्याग्रह वर्ष म्हणून पाळण्याचे ठरवले असल्याचे ॲड. कारभारी गवळी यांनी सांगितले आहे.

