जागेवरुन महायुतीच्या इच्छुकांमध्येच रस्सीखेच
पुणे (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील मित्र पक्षांमध्ये जागा वाटपाबाबत खलबते सुरू आहेत. पुण्यातील मतदार संघामध्ये जागा वाटपात कुठली जागा कुणाला मिळेल? हे अजूनतरी स्पष्ट झालेलं नाही. पण, महायुतीतल्या मित्र पक्षातील इच्छुकांकडून मतदारसंघांवर दावा केला जात आहे. यामुळे महायुती घडण्याची किंवा बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
खडकवासला मतदार संघात भाजपचे भीमराव तापकीर विद्यमान आमदार आहेत. तसेच शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे हे निवडणूक लढविण्यास इच्छूक आहेत. शिंदे गटाबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने या मतदारसंघावर दावा केला असून, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर याही या भागातून निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत. त्यामुळे ही जागा महायुतीतलल्या कोणाला मिळणार याबाबत प्रश्न आहे.
विधानसभेच्या जागांबाबत महायुतीच्या ज्या बैठका घेण्यात आल्या, त्यात ज्या ठिकाणी विद्यमान आमदार आहे, ती जागा त्या पक्षाला सोडण्यास वरिष्ठ नेत्यांची सहमती आहे. सध्या खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपचे भीमराव तपकीर हे आमदार आहेत. त्यामुळे ही जागा भाजपला मिळण्याची शक्यता आहे. तर शिंदे शिवसेनेचे रमेश कोंडे यांचा उत्कृष्ट जनसंपर्क आणि पक्की मते ही त्यांची जमेची बाजू आहे.
आता याबाबत महायुतीच्या नेत्यांनी निर्णय घ्यावा आणि शिंदे गटाला जागा सोडावी, अशी मागणी वजा इशारा कोंडे यांनी दिला आहे. त्यामुळे खडकवासलाची जागा कोणाला द्यायची? याबाबात महायुतीतील नेत्यांकडून बंडखोरी होणार का? हे येत्या पुढील काळात समजणार आहे.
